धाराशिव (प्रतिनिधी)- जैन धर्मीयांचे पवित्र पर्युषण पर्व सुरू झाले आहे. यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धाराशिव जिल्ह्यातील कत्तलखाने, मांसविक्री बंद ठेवण्यात यावी, अशी मागणी सकल जैन समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दरवर्षी जैन समाजाचा भाद्रपद महिन्यात पावन-पवित्र पर्युषण महापर्व येत असते. या काळात जैन समाज जिनेंद्र भगवंतांची आराधना, आभिषेक, शांतीधारा पूजन करून एकासन, उपवास करून संयम पाळतात. अहिंसेचे पुजारी भगवान महावीरांनी संपूर्ण जगास मानव कल्याणासाठी सत्य अहिंसा, अचोर्य, अपरिग्रह, ब्रह्मचर्याची शिकवण दिली. त्याचे पालन करण्यासाठी जैन समाजाचे नागरिक यथा शक्तीनुसार प्रयत्न करित असतात. मुंबई उच्च न्यायालयाने पर्युषण महापर्व जैनांचा पावन - पवित्र उपासना पर्व असल्यामुळे या दिवसात प्राण्यांची हत्या होऊ नये म्हणून या काळात कत्तलखाणे,मांसविक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे धाराशिव जिल्ह्यातही या आदेशाचे पालन व्हावे, अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्यासह पालिकेचे मुख्याधिकारी, पोलिस अधीक्षक यांनाही निवेदन देण्यात आले. या प्रसंगी सकल जैन समाजाचे अध्यक्ष उल्हास चाकवते, सचिव अतुल अजमेरा, कुंथलगिरी सिध्दक्षेत्र महामंत्री संतोष शहा, रमेश फडकुले, सुदेश फडकुले, कुणाल गांधी, शैलेश शहा, अतुल कांबळे, अमित अजमेरा, प्रशांत येणेगूरे, हेमंत पांडे, हजर होते.