कळंब (प्रतिनिधी)- यावर्षी कळंब तालुका व परिसरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. यामुळे बीड, धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणारी मांजरा नदी पात्र भरून वाहत असून मांजरा नदीवरील धनेगाव येथील मांजरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. या धरणाचे बॅक वॉटर कळंब पर्यंत असते. यामुळे कळंब येथील मांजरा नदी पात्रात भरपूर जलसाठा झाला आहे. कळंब शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून या तालुक्यातील धरण क्षेत्रातील गावानां शेतीसिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असल्याने परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहे. नदी प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कळंब शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी दिनांक 27 सप्टेंबर रोजी बीड, धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवरील मांजरा नदी पूल येथे नदीजलाचे विधीवत पूजा, आरती करून मांजरा माई पात्रात वस्त्र, श्रीफळ, पुष्प अर्पण करण्यात आले. या वर्षी प्रमाणे प्रतिवर्षी भरपूर पाऊस व जलसाठा रहावा. ज्यामुळे परिसरात शेती उद्योग व पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल  परिसरात समाधान, आनंद राहील यासाठी प्रार्थना करण्यात आली. या पूजा कार्यक्रमाचे आयोजन ज्येष्ठ  नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष हभप. महादेव महाराज अडसूळ, मराठवाडा प्रदेश सचिव डी.के. कुलकर्णी, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश टेकाळे,  जी.बी.मोराळे, माधवसिंग राजपूत, संदीप कोकाटे, सचिन क्षिरसागर, सुधाकर चौरे, नवनाथ भंडारे, राजकुमार आडसुळ, सुरेंद्र शिलवंत, सनिल गाढे यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने करण्यात आले.

 
Top