धाराशिव (प्रतिनिधी)- अमरेंद्र भास्कर बालकुमार साहित्य संस्था पुणे शाखा धाराशिवच्या वतीने एकलव्य प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा यमगरवाडी या ठिकाणी लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमाच्या निमित्ताने कथाकथन व काव्यवाचनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे धाराशिव शाखेचे अध्यक्ष युवराज नळे हे होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध बालरोगतज्ञ तथा एकलव्य संकुलाचे उपाध्यक्ष डॉ.अभय शहापूरकर, बालकुमार चे मार्गदर्शक जेष्ठ साहित्यिक श्री.राजेंद्र अत्रे, बालकुमार चे कार्यवाह बालसाहित्यिक श्री.समाधान शिकेतोड, संस्थेचे सदस्य श्री.धनंजय पाटील, डॉ. प्रणिता गडेकर, मुख्याध्यापक श्री.अण्णासाहेब कोल्हटकर,श्री.विठ्ठल म्हेत्रे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष तथा बालकुमार चे मार्गदर्शक डॉ. अभय शहापूरकर यांनी केले. बालसाहित्यिक श्री. समाधान शिकेतोड यांनी 'पोपटाने शोधले उत्तर' ही कथा मुलांना सांगितली. कथेतील जादुई जंगलातील प्राण्यांच्या गमती-जमती ऐकून मुले मंत्रमुग्ध झाले होती. मुलांना खूप खूप आवडली. प्रसिद्ध साहित्यिक श्री.राजेंद्र अत्रे यांनी विद्यार्थ्यांना छान कविता ऐकविल्या. मुलांनी उत्साहाने कवितांचे गायन केले. यावेळी लेखक श्री.समाधान शिकेतोड यांनी आश्रमशाळेच्या ग्रंथालयास जादुई जंगल, गावाकडची मजा, पोपटाची पार्टी,ही त्यांची बालसाहित्याची पुस्तके भेट दिली. या बालकथा कथनाच्या कार्यक्रमामुळे प्रभावित होऊन प्राथमिक आश्रम शाळेतील विद्यार्थिनी श्रावणी पाटोळे व प्राजक्ता आलमले यांनीही छोट्या कथा सादर केल्या. यावेळी संस्थेतील यशवंत, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.युवराज नळे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या जिज्ञासू वृत्तीचे कौतुक करून संस्थेच्या कामाचेही कौतुक करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री.अण्णासाहेब कोल्हटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षक श्री.अण्णासाहेब मगर यांनी केले.