धाराशिव (प्रतिनिधी)- 2019 च्या तुळजापूर विधानसभा निवडणुकीत आपण प्रबल दावेदार होतो. परंतु पक्षाने विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासाठी माघार घ्यावे असे सांगितले. त्यामुळे 2024 च्या तुळजापूर विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक लढविण्यावर ठाम आहे. भाजपने 2019 ला उमेदवारीबाबत दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करावी. अशी मागणी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा रूपामाता उद्योग समुहाचे प्रमुख ॲड. व्यंकट गुंड यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
गुरूवार दि. 26 सप्टेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेस जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरूजी, बाबुराव पुजारी आदी उपस्थित होते. 2019 च्या निवडणुकीमध्ये युतीमुळे भाजपाला तुळजापूर विधानसभा मतदारसंघ लढवावा लागला. त्यावेळेस आम्ही पूर्ण क्षमतेने काम करून भाजप उमेदवार निवडून आणाला. नुकत्याच झालेल्या सर्व्हेमध्ये तुळजापूर विधानसभा मतदारसंघात माझे नाव अग्रेसर आहे असे सांगून व्यंकट गुंड यांनी धाराशिव तालुक्यातील 72 गावे व तुळजापूर तालुक्यातील 123 गावात दुध संघ, गुळ पावडर फॅक्टरी, रूपामाताच्या शाखा, शाळा, कॉलेज्स आदी आहेत. त्यामुळे सर्व गावातील लोकांशी माझा सारखाच संपर्क येतो. जिल्ह्यातील सहकार क्षेत्र संपविण्याचे महापाप काही लोकांनी केले आहे. अशा वेळी मी मात्र सहकार क्षेत्राच्या माध्यमातून अनेक संस्थांची उभारणी केली. माझा सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शी आहे. शेतकऱ्यांची रक्तवाहिणी असलेली जिल्हा सहकारी बँक बंद पडण्याच्या मार्गावर आहे. सहकार क्षेत्रातील दूध संघ जागेसह विकला आहे. त्यामुळे युवकांना रोजगारासाठी पुणे-मुंबई गाठावे लागल आहे. बंद पडलेले साखर कारखाने जिल्हा बँकेने ताब्यात घेवून खाजगी व्यक्तीस चालविण्यास दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात व तुळजापूर विधानसभा मतदारसंघात सहकार क्षेत्र सुधारण्यासाठी, युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विधानसभा निवडणूक लढविण्याची आवश्यकता आहे. पक्षाने आपणास उमेदवारी न दिल्यास अन्य पर्याय आपल्यापुढे आहेत. अशा इशाराही ॲड. व्यंकट गुंड यांनी दिला आहे.