धाराशिव (प्रतिनिधी)-साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती भारतीय जनता पार्टी कार्यालय प्रतिष्ठान भवन धाराशिव येथे साजरी करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे मा. जिल्हाध्यक्ष श्री नितीन काळे यांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा आपल्या लेखणीतून रशियापर्यंत पोहोचवणारे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे हे विज्ञानवादी दृष्टिकोनातून पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर तरलेली नसून ती कामगार व कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे असे ठामपणे सांगत होते. अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी कथा, कादंबऱ्या, वगनाट्य, प्रवासवर्णने, लोकगीते, पोवाडे इत्यादी साहित्यांची निर्मिती केली. त्यांच्या सबंध साहित्यात महाराष्ट्र प्रेमाची आस दिसून येते. अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये मुंबई बरोबरच कृष्णा कोयना वारणेचा सजीव देखावा रेखाटलेला असून निसर्ग प्रेमाची आस्था अण्णाभाऊंच्या साहित्यातून दिसून येते. त्यांचे एकूण सामाजिक कार्य व साहित्य हे ग्रामीण जीवनाची व्यथा व कथा सांगणारे असून त्यांचे जीवन समाजासाठी सामाजिक न्याय आणि हक्कांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत श्री नितीन काळे यांनी यावेळी व्यक्त केले.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अभय इंगळे, निहाल काझी, बाळासाहेब खांडेकर, उद्धव पाटील, नामदेव नायकल, अमोल पाटील, शिवाजी गव्हाणे, अमर बाकले, सागर दंडनाईक यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top