धाराशिव (प्रतिनिधी)- या स्पर्धेच्या युगात दिवसेंदिवस नोकरी मिळणे कठीण असले तरीही तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला पोटापाण्याचा प्रश्न सहज सोडवता येतो. नोकरी ही सहज मिळते. पण आपण स्वतःच नोकरी देणारे जेव्हा बनतो तेव्हा मिळणारा आनंद हा अद्वितीय असतो. असे उदगार येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी वैभव मंडलिक यांनी काढले.
2013 च्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग या बॅचचे विद्यार्थी वैभव मंडलिक यांनी विद्यार्थी दशेतच आपण उद्योजक व्हायचे ठरविले होते. त्यानुसार त्यांनी अथक मेहनत घेऊन त्यांनी अवधूत एंटरप्राईज कॅम सोल्युशन व वैभव एंटरप्राइज हे स्वतःचे व्यवसाय छत्रपती संभाजीनगर येथे सुरू केला असून त्याचा टर्नओव्हर हा सुद्धा खूप चांगला लाखाच्या घरात आहे.
त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या या उद्योगांमध्ये नोकरीला लावलेले आहे. त्यामुळे एक वेगळे समाधान त्यांनी व्यक्त केले. आपल्या महाविद्यालयाला सहज सदिच्छा भेट देण्यासाठी आलेल्या वैभव मंडलिक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की नोकरीच्या मागे न लागता स्वतः मध्ये स्किल असेल , अर्थक मेहनत घेण्याची तयारी असेल तर आपण आपल्या उद्योग धंद्यामध्ये सहज जम बसवू शकतो. फक्त मार्केटिंगचे आद्ययावत ज्ञान असणे, मार्केटच्या गरजा या गोष्टी लक्षात घेतल्या की आपण सहजपणे यश मिळवू शकतो. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने यांनी त्यांचा सत्कार करून कौतुक करून, त्यांना शुभेच्छा दिल्या आणि सांगितले की, मी या विद्यार्थ्याला स्वतः शिकवले असून हा विद्यार्थी नक्कीच भविष्यामध्ये मोठा होईल असा मला विश्वास होता त्याप्रमाणे त्यांनी उद्योग सुरू केले याचा आम्हाला सार्थ गर्व आहे हो नक्कीच भविष्यात देखील तो त्याच्या उद्योगाचे जाळे निर्माण करेल.
मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. डी. डी. दाते यांनीही यावेळी सांगितले की, विद्यार्थी मेहनती असेल तर नक्कीच तो सहज यश मिळवू शकतो .याचे उत्तम उदाहरण म्हणजे वैभव मंडलिक आहेत. मंडलिक यांनी सहपरिवार महाविद्यालयाला भेट दिल्याबद्दल आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मंडलिक यांचा सन्मान करून त्यांनाही शुभेच्छा देण्यात आल्या.