तुळजापूर (प्रतिनिधी)- केंद्र शासनाचे 30 एप्रिलचे परिपत्रक रद्द व्हावे या प्रमुख मागणी सह धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दि. 9 ऑगस्ट रोजी तुळजापूर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन झाले. नागपंचमीचा सण असताना देखील या आंदोलनाला शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.
केंद्र शासनाने लोकसभेच्या आचारसंहिता सुरू असताना काढलेल्या परिपत्रकामुळे धाराशिव जिल्ह्यातील पाच लाख 19 हजार शेतकऱ्यांची 900 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याचे दुधाचे अनुदान, कांद्याचे अनुदान, तुषार संचाचे अनुदान, सततच्या पावसाच्या अनुदान, दुष्काळाचे अनुदान इत्यादी रक्कम शासनाकडे थकीत राहिलेली आहे ती शेतकऱ्यांना त्वरित द्यावी. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देताना ईपीक पाहण्याची अट रद्द करावी, खरीप 2020 संदर्भातील मंजूर असलेली व्याज मागणी याचे किती रक्कम तातडीने द्यावी. या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या या प्रमुख मागण्यासाठी यापूर्वी 26 जुलै 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन पार पडले होते. शासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत म्हणून आता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हे आंदोलन करण्याचे आंदोलनाचे प्रमुख अनिल जगताप यांनी ठरवले आहे. त्यानुसार दि. 9 ऑगस्ट रोजी तुळजापूर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन पार पडले. यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आंदोलन होणार आहे.
या धरणे आंदोलनासाठी एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज पाटील, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शरद पवार, तुळजापूर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग तोफिक शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आदित्य गोरे, शिवसेनेचे पदाधिकारी सुधीर कदम, अमोल जाधव, काक्रंबेचे माजी सरपंच व्यंकट झाडे यांच्यासह दत्तात्रय जगताप, गणेश फत्तेपुरे इत्यादी उपस्थित होते. तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.