धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघात पुन्हा भगवा फडकविण्या साठी जोमाने कामाला लागण्याचे आदेश दिले. शिवसेनेचे धाराशिव जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी दिल्ली येथे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत चर्चा केली. तसेच जिल्ह्यातील कार्याचा अहवाल यावेळी त्यांनी सादर केला. धाराशिव-कळंब विधानसभेवर पुन्हा भगवा फडकवायचा आहे, ताकदीने कामाला लागा, असा कानमंत्र खासदार डॉ.शिंदे यांनी जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांना यावेळी दिला. 

धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्ह्यात शिवसेना पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्याचे काम जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी हाती घेतले आहे. धाराशिव शहरासह जिल्ह्यातील विविध प्रलंबित विकासकामांबाबत सतत पाठपुरावा करुन त्यांनी पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत, उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले व महायुती घटक पक्षातील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यातून भरघोस निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून धाराशिव नगर परिषद अंतर्गत भुयारी गटार योजनेसाठी आणि रस्त्यांच्या कामाला नुकताच 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कार्य अहवालाचे वाचन करुन त्यांनी समाधान व्यक्त करीत आणखी नव्या जोमाने कामाला लागण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या. यावेळी शिवसेना प्रवक्ते योगेश केदार उपस्थित होते.

 
Top