धाराशिव (प्रतिनिधी)- कलाविष्कार अकादमी व साहित्य भारती धाराशिव आयोजित 'श्रावण सरी..गीत कवितांची धुंद मैफिल ' कार्यक्रमात कवी संमेलन अध्यक्षा प्रा विद्या देशमुख यांनी आपले मत व्यक्त केले. कलाविष्कार अकादमी व साहित्य भारती धाराशिव आयोजित श्रावण सरी - कवितांची धुंद मैफिल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धाराशिव नगरीच्या जवळ असलेल्या धाराशिव लेणी येथील शिवगुरू मंदिराच्या प्रांगणात निसर्गरम्य परिसरात 15 ऑगस्ट या दिवशी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रा. विद्या देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात युवा कवीपासून ते बुजुर्ग कवी - कवयित्रींनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमात सुरुवातीला धाराशिव येथील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अभय शहापूरकर यांनी लॉ ची पदवी प्राप्त केल्याबद्दल व शरद वडगावकर यांची ग्राहक संरक्षण परिषद मध्ये सदस्यपदी निवड झाल्याबद्दल कलाविष्कार अकादमीचे अध्यक्ष युवराज नळे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. श्रावण सरी या कार्यक्रमाची सुरुवात धाराशिव येथील ज्येष्ठ कवी डॉ. मधुकर हुजरे यांनी सादर केलेल्या श्रावण गीताने झाली.
आपल्या मनातील नाजूक भावनांना वाट मोकळी करून देत असताना युवा कवी अविनाश मुंडे यांनी सर्व प्रेमी युवा वर्गाच्या भावना आपल्या रचनेतून मांडताना ते म्हणाले -
या आघाताचे काय करू सांग ना
तुझ्या या वागण्याचे काय करू सांग ना
ज्यांच्या नावावर 'खोपा' कथासंग्रह आहे त्या सुनीता गुंजाळ कवडे यांनी आपल्या बहारदार गझलेने मैफिलीत रंगत आणली -
चिता माझी जळत होती तरी का थांबला नाही
जरी सोडून त्याला घास घेतला नाही
आषाढी वारीच्या अनुभवावर भाष्य करताना भागवत घेवारे यांनी आपल्या गझलेत म्हटले -
एक भाबडी इच्छा माझी पुरी करावी
व्हावी अवघ्या देहाची पंढरी विठ्ठला
कार्यक्रमात ॲड जयश्री तेरकर यांनी श्रावणावरचे कविता सादर करून रसिकांची दाद मिळवली -
वनव्याच्या कमरेस बांधून मेखला,
जाळणाऱ्या ग्रीष्मास पळवून आला,
सृष्टीस तृप्त करण्या बरसू लागला,
रंगांची उधळण करत इंद्रधनू आला
श्रावण आला, श्रावण आला....
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन करणाऱ्या हणमंत पडवळ यांनी ज्येष्ठ नागरिकांची व्यथा मांडणारी कविता सादर केली.
गलितगात्र
काळोख पसरत
निघालेल्या रात्रीत
अंथरुणावर डोळे मिटून
भूतकाळ उसवत असतो ... तेव्हा,
कृष्णा साळुंके यांचे सुटे शेर व हिंदी गझल त्यांच्या अभ्यासाची प्रचिती देत होते. तसेच युवा पिढीतील युसुफ सय्यद, गणेश मगर उर्फ गन्शा, बाळासाहेब मगर, सौ वडगावकर यांनीही बहारदार रचना सादर केल्या. समाधान शिकेतोड यांची बालकविता सर्वांना भावली.
वेदनांनी मजसवेच जरी दोस्ती केली
मी हसत खेळतच मग त्यासवे मस्ती केली
ही सुवर्णा शिनगारे यांची रचना या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली. तेरणा साखर कारखाना प्रशाला तेरणानगर या प्रशालेच्या शालेय समितीच्या उपाध्यक्ष सौ रेखा कदम या कार्यक्रमासाठी आपल्या मुलांसह आवर्जून उपस्थित राहिल्या. त्यांनी श्रावणावरील सुंदर कविता सादर केली. या कार्यक्रमासाठी डॉ अभय शहापूरकर, सुरेश शेळके, अब्दुल लतीफ, शरद वडगावकर, मुकुंद पाटील, सौ वर्षा नळे, सौ सीमा घेवारे, विश्वानंद गायकवाड, राजाभाऊ कारंडे, बाबा मुळीक यांनी आवर्जून उपस्थिती लावली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होऊन नंतर शिवगुरू मंदिराच्या प्रांगणात मुकुंद पाटील यांच्या गीत गायनासह निसर्गरम्य परिसरात सहभोजनाचा सर्वांनी आस्वाद घेतला.