धाराशिव (प्रतिनिधी)- प्रांताधिकारी संजयकुमार डव्हळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे 12 दिवसांची वैद्यकीय रजा मागितली. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील महत्वपूर्ण जबाबदारी पाहता डव्हळे यांनी सोलापूरच्या मेडिकल बोर्डाकडून तपासणी करून घ्यावी, असा सल्ला देत वैद्यकीय रजा नामंजूर केली आहे. तसेच उपविभागीय अधिकारीपदाचा पदभार जिल्हा पुनर्वसन अधिकारी अरूणा गायकवाड यांच्याकडे सोपविला आहे. 

प्रांताधिकारी संजयकुमार डव्हळे यांनी 8 ते 19 जुलै दरम्यान रजेचा अर्ज मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला आहे. त्यांनी सादर केलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रावरून त्यांना कोणता आजार झाला हे समजत नाही. वैद्यकीय उपचारासाठी लागणारा निश्चित कालावधी स्पष्ट होत नसल्याने त्यांचा रजेचा अर्ज नामंजूर करण्यात आला. डव्हळे यांनी मेडिकल बोर्ड, शासकीय रूग्णालय सोलापूर यांच्याकडून तपासणी करण्याचा सल्ला जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. प्रांताधिकारी डव्हळे यांच्याकडे निवडणूक, भूसंपादन, सुरत-चेन्नई, रेल्वेमार्ग, लेक लाडकी अभियानाची जबाबदारी आहे. ते रजेवर गेल्यास कामकाजावर परिणाम होणार, त्यामुळे या कार्यालयाचा पदभार जिल्हा पुनर्वसन अधिकारी अरूणा गायकवाड यांच्याकडे सोपविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 


प्रशासकीय कारवाईचा प्रस्ताव आयुक्तांकडे

जात प्रमाणपत्रावर वेळेत निर्णय न घेणे, सुरत-चेन्नई महामार्ग संपादन प्रकरणात मोबदला वाटप नकरणे, वकिलांना अपमानास्पद वागणूक देणे, जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटीसला उत्तर न देणे, वारंवार रजेवर जाणे, कार्यालयीन कामकाजावर स्वारस्य न दाखविणे आदी कारणांमुळे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी प्रांताधिकारी डव्हळे यांच्याविरोधात शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना सादर केला आहे.


 
Top