धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील मोठा उद्योग समूह असलेल्या रुपामाता समूहाचे संस्थापक आणि भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड.व्यंकटराव गुंड हे तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्याकरिता त्यांनी मतदारसंघात गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून थेट जनतेशी संवाद साधत आहेत.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व धाराशिव जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य-पाटील यांना मुंबईत भेटून उमेदवारीची संधी मिळावी अशी रितसर मागणी त्यांनी केली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील पाडोळी (आ.) या छोट्याशा गावातून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्याला ॲड. व्यंकटराव गुंड यांनी सुरुवात केली. गुंड कुटुंब म्हणजे जनता पक्ष,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, संघ परिवार आणि भाजप हे समीकरण मागील जवळपास 40 वर्षांपासून कायमचे राहिलेले आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वातावरणात यांची जडणघडण झालेली आहे. आजपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या संघटनांमध्ये विविध पदावर काम काम केलेले असून सध्या ते भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य म्हणून पक्षात सक्रिय आहेत. राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर, दुध उत्पादक, ऊस उत्पादकांबरोबर लहान मोठ्या व्यावसायिकांच्या जीवनात गुंड यांनी आर्थिक क्रांती घडवून आणली आहे. रुपामाता समूहातील मल्टीस्टेट, अर्बन बँक, दुध डेअरी, वेअर हाऊस, साखर कारखाना अशा वेगवेगळ्या उद्योगांच्या माध्यमातून हजारो युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. विशेष म्हणजे रुपामाता उद्योग समुहातील दोन जागरी कारखाने व दुध डेअरी प्रोजेक्ट हे तुळजापूर विधानसभा मतदारसंघात आहेत.
त्यांचे ज्येष्ठ बंधू सुधाकरराव गुंड (गुरुजी) यांनी पाडोळी गावचे सरपंचपद अनेक वर्ष भूषविले. त्याचबरोबर पाडोळी (आ.) धाराशिव जिल्हा परिषद सदस्य आणि उपाध्यक्ष पदावर त्यांनी यशस्वी काम केले आहे. त्यांच्या भावजय सौ.कौशल्या सुधाकर गुंड ह्या देखील सरपंच, जिल्हा परिषद सदस्य आणि केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदावर कार्यरत होत्या. तर पत्नी सौ. सुलभा व्यंकटराव गुंड यांनीही गावचे सरपंचपद आणि जिल्हा परिषद सदस्यपद अनेक वर्षे यशस्वीरीत्या सांभाळून विकासकामे केली. ॲड.गुंड यांनीही अनेक वर्ष गावचे सरपंचपद त्याचबरोबर गृहरक्षक दलाचे जिल्हा समादेशक पदावर काम पाहिलेले आहे.
मागील 2019 मध्ये देखील त्यांनी तुळजापूर विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र जिल्ह्याच्या राजकारणात मोठे बदल झाल्यामुळे त्यांना पक्षाकडून संधी मिळाली नाही. तरीही ते पक्षाचे काम प्रामाणिकपणे करत आहेत. आता 2024 विधानसभेसाठी पक्षाकडून त्यांनी उमेदवारीची इच्छा पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे 2019 साली उमेदवारी मिळाली नाही तरी देखील तुळजापूर विधानसभा मतदार संघातील जनसंपर्क त्यांनी कायम ठेवलेला आहे. या मतदार संघातील नागरिकंनीही ॲड.गुंड यांनी निवडणूक लढवावी, अशी इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यामुळे 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी, अशी मागणी. ॲड.गुंड यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि धाराशिव जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटील यांच्याकडे केली आहे.