धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने 15 जुलै 2024 पासून प्रवाश्यांच्या समस्या,तक्रारी आणि सूचनांचा स्थानिक पातळीवर जलद गतीने निपटारा होण्याच्या उद्देशाने प्रत्येक आगारात दर सोमवारी व शुक्रवारी “प्रवासी राजा दिन ” आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमात विभाग नियंत्रक आगारात जाऊन प्रवाशांच्या व रा.प. कर्मचाऱ्यांच्या समस्या,तक्रारी व सूचना ऐकून घेतील.त्या तातडीने सोडविण्याच्या दृष्टिने उपाययोजना करतील.त्यामुळे प्रवाशांचे समाधान होऊन प्रवासी दर्जा व गुणवत्ता वाढण्यास मदत होईल.असे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांनी व्यक्त केले आहे.
धाराशिव विभागातील आगारात विभाग नियंत्रक “ प्रवासी राजा दिन ” व “ कामगार पालक दिन ” साजरा करण्याकरीता पुढीलप्रमाणे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
सोमवार 15 जुलै रोजी धाराशिव आगार, शुक्रवार 19 जुलै रोजी भूम आगार,सोमवार 22 जुलै रोजी तुळजापूर आगार,शुक्रवार 26 जुलै रोजी कळंब आगार,सोमवार 29 जुलै रोजी परंडा आगार,शुक्रवार 2 ऑगस्ट रोजी उमरगा आगार,सोमवार 8 ऑगस्ट रोजी धाराशिव आगार, शुक्रवार 9 ऑगस्ट रोजी भूम आगार, सोमवार 12 ऑगस्ट रोजी तुळजापूर आगार, शुक्रवार 16 ऑगस्ट रोजी कळंब आगार,सोमवार 19 ऑगस्ट रोजी परंडा आगार आणि शुक्रवार 23 ऑगस्ट रोजी उमरगा आगार याप्रमाणे प्रवासी राजा दिवस साजरा करण्यात येणार आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात सकाळी 10 ते दुपारी 2 वाजता या वेळेत “प्रवासी राजा दिन” साजरा करण्यात येणार आहे.या वेळेत प्रवासी,प्रवासी संघटना, शाळा-महाविद्यालये आपल्या समस्या, तक्रारी मांडू शकतात.प्रवासी राजा दिन झाल्यानंतर दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजताच्या वेळेत “कामगार पालक दिन” साजरा करण्यात येणार आहे.या वेळेत संघटना व राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वैयक्तीक तक्रारीचे तात्काळ निराकरण करण्यात येणार आहे.
तरी सर्व प्रवासी बंधू-भगिनींनी व राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांनी याचा लाभ घेऊन आपल्या समस्यांचे निराकरण करुन घ्यावे, असे एस.टी महामंडळ रा.प.धाराशिव विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे.