धाराशिव (प्रतिनिधी)-येथील भाजपा कार्यालय प्रतिष्ठान भवन येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवची मंडळ बैठक भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष श्री नितीन काळे यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आली. या बैठकीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले त्याबद्दल अभिनंदन ठरावही घेण्यात आला. महायुती सरकारने मांडलेल्या अंतरीम अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी लोक कल्याणकारी योजना आखून अंमलबजावणी केली. यामध्ये प्रामुख्याने महिला, शेतकरी, तरुण व सर्वसामान्य नागरिक यांच्या हितांच्या योजनेचा समावेश केल्याबद्दल सरकारचे अभिनंदनही करण्यात आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांच्या सबलीकरणासाठी आणि सक्षमीकरणासाठी बळ देईल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विज बिल माफ करून सरकारने खूप मोठा दिलासा दिला आहे. तरुणांसाठी उद्योग व कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण आणि त्यासाठी लागणारे विद्यावेतनही या सरकारने अर्थसंकल्पामध्ये दिले आहे. असे यावेळी नितीन काळे यांनी म्हटले आहे.

अठराव्या लोकसभेच्या सत्रामध्ये भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषनाच्या स्वागताचा ठरावही यावेळी घेण्यात आला. यामध्ये गेल्या दहा वर्षात सरकारने ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक पैलू वर भर दिला आहे. खेड्यापाड्यात कृषी आधारित उद्योग दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय आधारित उद्योगांचा विस्तार होत आहे. शेतकऱ्यांचा सन्मान म्हणून शेतकऱ्याला वेतनही केंद्र सरकारने याच काळात चालू केले आहे.भारत देशातील रस्त्यांचा विकास नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने अतिशय जलद गतीने केला आहे. देशाच्या श्रमशक्तीचा सन्मान म्हणून कामगाराची कल्याण आणि सक्षमीकरनास सरकारने प्राधान्यक्रम दिला आहे. सुरक्षा क्षेत्रामध्ये देशाचे प्राबल्य वाढल्याचेही यावेळी श्री. नितीन काळे यांनी अधोरेखित केले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधून येणाऱ्या काळात सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोमाने कामास लागावे असे आवाहनही श्री.नितीन काळे यांनी केले.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे सुनील काकडे, शहराध्यक्ष अभय इंगळे, सतीश बाप्पा देशमुख, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजे निंबाळकर, दाजी आप्पा पवार, पांडुरंग लाटे, विनोद निंबाळकर, अमोल राजे निंबाळकर, संदीप इंगळे, गणेश बाप्पा मोरे, रोहित देशमुख, बप्पा उंबरे, बापू पवार, दत्ता पेठे, किशोर पवार, प्रवीण सिरसाटे, प्रसाद मुंडे, अमित कदम, जितेंद्र नाईकवाडी, प्रमोद बचाटे, विकास पवार, सागर दंडनाईक, आदींसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top