धाराशिव  (प्रतिनिधी)-जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास विमा कंपनी टाळाटाळ करीत आहे. त्यातच केंद्र सरकारने दि. 30 एप्रिल रोजी काढलेल्या त्या परिपत्रकाचा विचार न करता विमा भरताना ज्या परिपत्रकाप्रमाणे शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, त्याप्रमाणे पीक विमा रक्कम 15 दिवसांच्या आतमध्ये देण्यात यावी. तसेच तुळजापूर तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करून पीक विम्याची अग्रीम रक्कम देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने विभागीय आयुक्ताकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यावरती दुष्काळ पिक विमा या संदर्भात जिल्हा व तालुका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आर्थिक अन्याय करून शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनेपासून वंचित ठेवले आहे.  या संदर्भात शेतकऱ्यांनी वारंवार जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तहसिलदार यांना वारंवार निवेदने देऊन आंदोलने करून देखील त्याची दखल घेतली नाही. उलट चुकीच्या पद्धतीने दुष्काळाचे नियम लावून शेतकऱ्यांवर अन्याय करण्याचे काम केले आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. तसेच वाशी धाराशिव व लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान देण्यात आलेले आहे. त्याप्रमाणे 15 दिवसांच्या आत तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान, पीक विमा तसेच दुष्काळी उपाय योजनांमध्ये शेतकऱ्यांना विविध बँकांच्या कर्जाची बाकी, कृषी पंपाच्या वीज बिलाची माफी, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी 2023 मध्ये भरलेले परीक्षा शुल्क माफ करून ते शुल्क परत देण्यात यावे आदी मागण्या 15 दिवसांत पूर्ण करण्यात याव्यात. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे. या निवेदनावर दिलीप जोशी, सरदारसिंग ठाकूर, व्यंकट पाटील, पंडित पाटील, गुलाब शिंदे, अजमुद्दीन शेख, महादेव बिराजदार, बालाजी ठाकूर, महेश घोडके, श्रीकांत पोतदार, प्रताप ठाकूर, बंडू मोरे, दिलीप पाटील, काशिनाथ काळे, तोलू पाटील, महादेव गोरे, राजेंद्र व्हनताळे, रहेमान शेख, गणपत सुरवसे, शहानवाज शेख यांनी यांच्या सह्या आहेत.


 
Top