धाराशिव (प्रतिनिधी)-मनोज जरांगे पाटील यांनी चालू केलेल्या आमरण उपोषणाची सरकारने तत्काळ दखल घ्यावी. सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी तातडीने करावी. मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घेण्यात यावे. या मागण्यासाठी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर पाच आंदोलनकर्त्यांनी आमच्या मागण्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत मान्य नाही केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छतावरून उडी मारून जीव देणार असे जाहीर केले होते. बरोबर पाच वाजता जरांगे पाटील यांना फोन करून ॲड. रितापुरे, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी आंदोलनकर्त्यांशी बोलून हे आंदोलन मागे घेण्यात आले.

बुधवार दि. 12 जून रोजी सकाळी 11 वाजता अभिजित सुर्यवंशी, अमोल जाधव, अक्षय नाईकवाडी, तेजस बोंबडे, प्रकाश पाटील यांनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छतावर तर इतर तीन युवक धाराशिव तहसील कार्यालयाच्या छतावर चढून मराठा आरक्षणाविषयी घोषणाबाजी केली. यावेळी सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला. आमच्या आंदोलनाची दखल घेवून तातडीने सरकारने मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे घेण्यासाठी मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. सायंकाळी पाच वाजेपर्यत आंदोलनकर्ते छतावर असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अपतकालीन विभाग व्यवस्थापनाकडून खाली जाळी बांधून वाढीव पोलिस फोर्स दुपार नंतर तयार ठेवला होता. दुपारी दोन वाजता निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी छतावर जावून आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. परंतु ही चर्चा यशस्वी झाली नाही. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी आंदोलनकर्त्यांना छतावरून खाली उतरण्यासाठी बोलत होते. परंतु त्याचा काहीही परिणाम झाला नाही. सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान ॲड. रितापुरे व जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी जरांगे पाटील यांच्याशी संपर्क साधून आंदोलनकर्त्यांशी बोलणे करून दिले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेवून जरांगे पाटील यांनी आपणास आंतरवाली सराटी येथे भेटण्यास बोलवल्याचे सांगितले. यावेळी मराठा कुणबी प्रमाणपत्र वैधता तपासणी प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढू असे जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले. 


गुरूवारी अधिकाऱ्यां सोबत बैठक

मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनकर्त्यांशी बोलताना तुम्ही आंदोलन स्थगित करा असे सांगून गुरूवारी अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटी येथे येत आहेत. त्यासाठी आपण पण अंतरवाली सराटी येथे या असे सांगितले. त्यानंतर आंदोलनकर्ते सायंकाळी आंतरवाली सराटीकडे रवाना झाले.

 
Top