तुळजापूर (प्रतिनिधी)- मतीमंद अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार प्रकरणी आरोपीस जन्मठेप (आजन्म कारावास) व  10 हजार रूपये द्रव्य दंडाची शिक्षा   अंजु शेंडे मॅडम, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश (विशेष न्यायाधीश) धाराशिव यांनी  सुनावली आहे.

या बाबतीत अधिक माहीती अशी की, प्रकरणाची थोडक्यात हकीकत- दि.08.10.2019 रोजी पो.स्टे. उस्मानाबाद (ग्रामीण) येथे पिडीत मुलीच्या आईने

फिर्याद दिली की, दि.06.10.2019 रोजी त्यांची गतीमंद अल्पवयीन मुलगी ही देवीच्या मंदिराकडे आरती करीता रात्री 8.00 वाजता गेली असता त्याठिकाणी आरोपी नामे रामेश्वर शिवाजी माने हा आला. त्याने तुझ्या आईने तुला घरी बोलावले आहे. असे म्हणुन मुलीस घरी घेवुन येत असताना वाटेत एका पडीक घरात घेवुन जावुन त्याठिकाणी आरोपीने पिडीत मुलीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याचे मुलीने आईस सांगितल्यावरून पो.स्टे. उस्मानाबाद (ग्रामीण) येथे गु.र.नं. 242 / 2019 दिनांक 08.12.2019 रोजी गुन्हा नोंद होवुन उस्मानाबाद (ग्रामीण) पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस उपनिरिक्षक हिना शेख यांनी गुन्हयाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर दोषारोप पत्रावरून आरोपींच्या विरूध्द गुन्हा सिध्दीसाठी सरकार पक्षाच्यावतीने एकुण 10 साक्षीदार तपासण्यात आले. सदर प्रकरणात पिडीतेची न्यायालयात झालेली नैसर्गिक साक्ष, पिडीतेची आई व तिची आजी यांची पिडीतेच्या सुसंगत साक्ष तसेच वैदयकीय अधिकारी यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली. सदर प्रकरणात कोर्ट पैरवी म्हणुन महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल कोठावळे, पो.स्टे. उस्मानाबाद (ग्रामीण) यांनी काम पाहिले.

सदर प्रकरणाची सुनावणी मा. एस. डी. जगताप साहेब, तत्कालीन अति. सह जिल्हा व सत्र न्यायाधीश उस्मानाबाद यांचे समोर झाली. त्यानंतर  एस. डी. जगताप हे सेवानिवृत्त झाल्यामुळे सदर प्रकरणाची अंतिम सुनावणी अंजु शेंडे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उस्मानाबाद यांच्यासमोर झाली. न्यायालयासमोर आलेला साक्षीपुरावा व अति. शासकीय अभियोक्ता  सचिन एस. सुर्यवंशी, यांचा युक्तीवाद ग्राहय धरुन अंजु शेंडे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश (विशेष न्यायाधीश) धाराशिव यांनी आरोपी रामेश्वर शिवाजी माने यास बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदाचे कलम 6 नुसार दोषी धरून आरोपीस जन्मठेप म्हणजेच आजन्म कारावास तसेच रु. 10 हजार रूपये द्रव्यदंड अशी शिक्षा दिनांक 10 जून 2024 रोजी सुनावली. ज्या कलमाअंतर्गत आरोपीला दोषी ठरवुन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली त्यातील तरतुदीनुसार सदर आरोपीस त्याचे उर्वरीत नैसर्गिक आयुष्य हे कारागृहात काढावयाचे आहे. विशेष म्हणजे आरोपीचे लग्न झालेले असुन त्याला पिडीतेच्या वयाच्या मुली असतानाही त्याने सदरचे दुष्कर्म केलेले आहे. सदर प्रकरणात अभियोग प्रक्षाच्या वतीने सचिन एस. सुर्यवंशी, अतिरिक्त शासकीय अभियोक्ता, धाराशिव यांनी बाजू मांडली.

 
Top