धाराशिव (प्रतिनिधी)-ओबीसी, एनटी, एसबीसी प्रवर्गातील नर्सिंग अभ्यासक्रमाला म्हणजे एएनएम व जीएनएम प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृृत्ती मिळण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आह़े. असे सुधीर पाटील यांनी सांगितले.

सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीच्या बहुतांश योजना इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत विमुक्त जाती भटक्या जाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येतात. परंतु, या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती मिळण्यासाठी अनुज्ञेय अभ्यासक्रमांचे मॅपिंग केले नसल्याने या प्रवर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहत होते.

याच अनुषंगाने न्यायालयीन प्रकरणे देखील होती. गेल्या 10 वर्षांपासून ओबीसी, एन.टी. एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थी एएनएम आणि जीएनएम नर्सिंग या व्यावसायिक अभ्यासक्रमांपासून केवळ फिस भरणे शक्य नसल्याने शिष्यवृत्तीअभावी वरील प्रवर्गातील शेतकरी आणि मजुरांची मुले वंचित होते. या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी यासाठी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिवचे अध्यक्ष सुधीर पाटील, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य सुधीर पाटील, के.टी. पाटील नर्सिंग महाविद्यालयेचे प्राचार्य डॉ. गजानंद वाले, खासगी नर्सिंग स्कूल मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष, नर्सिंग कौन्सिलचे अध्यक्ष वेळोवेळी शासनस्तरावर लक्षवेधी पत्रव्यवहार व बैठका घेऊन पाठपुरावा केला. अखेर या पाठपुराव्यास यश मिळाले असून शासनाने मॅपींग करण्यास मान्यता दिलेल्या अभ्यासक्रमांमध्ये एएनएम, जीएनएम नर्सिंगचा समावेश आहे. या निर्णयामुळे या क्षेत्रात या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा कमी झालेला टक्का शिष्यवृत्तीच्या माध्यमातून वाढण्यास मदत होणार आहे.


 
Top