तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील खंडाळा कार्ला उंडरगाव या मार्गावरील चार किलोमीटर रस्त्यावर मोठ मोठाले खड्डे पडल्याने हा धोकादायक बनला असुन तो तातडीने दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. 

तुळजापूर तालुक्यातील अंतर्गत भागात असणाऱ्या कार्ला खंडाळा परिसरातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. हा रस्ता मागील वीस वर्षापासुन असाच असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.खंडाळा, कार्ला, उंडरगाव मार्गा हा रस्ता लोहाऱ्याला जातो. त्यामुळे या रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ असते. पण सध्या या रस्त्यावर असणाऱ्या चार किलोमीटर भागातील रस्त्यावर मोठमोठे खड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. आजारी रुग्ण, गरोदर महिला यांना दवाखान्यात नेण्यासाठी हा रस्त्या धोकादायक ठरत आहे.

या रस्त्यावरील खड्यांमुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात वाहनचालकांचे अपघात होण्याचा धोका वाढला आहे. विशेषतः पावसाळ्यात या रस्त्यावरून जीवावर उदार होवुन प्रवास करावा लागत आहे. पावसाच्या तोंडावर या रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास ही स्थिती आणखी गंभीर होऊ शकते. रस्त्यावरील खड्यांमुळे वाहन चालवणे खुपच धोकादायक झाले आहेत. यामुळे अपघातांची शक्यता सतत भेडसावत आहे असे स्थानिक ग्रामीण सांगण्यात आले आहे. 

 
Top