धाराशिव (प्रतिनिधी)-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात तुळजापूर, उमरगा, औसा, परंडा, बार्शी, उस्मानाबाद या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यामध्ये उस्मानाबाद विधानसभा वगळता पाचही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. महायुतीचे प्राबल्य असलेल्या पाच विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना 2 लाख 50 हजारापेक्षा जास्त मताचे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे या निवडणुकीतून महायुतीच्या विद्यमान आमदारांना धोक्याची घंटा असल्याचे दिसून आले आहे. 

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्यावतीने अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या तिकीटावर निवडणूक लढविली आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघ भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा विधानसभा मतदारसंघ असून, या मतदारसंघातून 52 हजार 176 मताची लीड ओमराजे निंबाळकर यांना मिळाली आहे. या मतदारसंघातील माजी मंत्री मधुकर चव्हाण यांचे पुत्र निवडणुकीमध्ये भाजपमध्ये आले होते. परंतु त्यांचा काहीही लाभ महायुतीच्या उमेदवाराला झाला नसल्याचे दिसून आले. तर औसा विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार अभिमन्यू पवार हे आहेत. या मतदारसंघातून सुध्दा महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर यांना 34 हजार 966 मताची लीड मिळाली आहे. उमरगा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार ज्ञानराज चौगुले हे आमदार आहेत. या मतदारसंघातून 43 हजार 944 मताची लीड ओमराजे निंबाळकर यांना मिळाली आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघातील काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी मंत्री बसवराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर माजी खासदार रविंद्र गायकवाड शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. सर्व नेते एकत्र असतानाही लीड मात्र महाविकास आघाडीला मिळाल्याने आर्श्चय व्यक्त केले जात आहे. 

भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघात शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत आमदार आहेत. या मतदारसंघातूनही महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर यांना 81 हजार 177 मताची लीड आहे. त्यामुळे पालकमंत्री सावंत यांना ही धोक्याची घंटा असल्याचे मानले जात आहे. तर बार्शी विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार राजेंद्र राऊत हे आमदार आहेत. या मतदारसंघातून 54 हजार 212 मताची लीड ओमराजे निंबाळकर यांना मिळाली आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट या पक्षातील दिग्गज लोकांच्या सभा झाल्या असल्यातरी महायुतीच्या उमेदवाराला याचा काहीच लाभ झाला नसल्याचे दिसून येत आहे. 

 
Top