धाराशिव (प्रतिनिधी)-उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक सध्या आर्थिक अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. बँकेस अडचणीतून बाहेर काढण्यासाठी नागपूर व वर्धा जिल्हा बँकेप्रमाणे या बँकेवर शासनाने पालक अधिकारी म्हणून विभागीय सहनिबंधक सुनिल शिरापूरकर यांची उस्मानाबाद जिल्हा बँकेवर पालक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. याबाबत नुकतीच शिरापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा बँकेचे संचालक मंडळ, सर्व कर्मचारी, गट सचिव व संस्था सचिव त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत संचालक मंडळासह सर्वांनी बँकेत ठेव रक्कम ठेवून बँकेची पत वाढवावी असे आवाहन सुनिल शिरापूरकर यांनी केले.

यावेळी त्यांनी बँकेला पुनर्जीवन करण्यासाठी बँकेने करावयाच्या उपायोजनाबाबत माहिती दिली, याची सुरुवात पालक अधिकारी म्हणून मी स्वत: बँकेत ठेव ठेवणार असल्याचे सांगून बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांनी पाच लाख, गट सचिव व संस्था सचिव यांनी तीन लाखाच्या ठेवी बँकेत कराव्यात, असे आवाहन केले.

यावेळी बँकेचे चेअरमन बापूराव पाटील, व्हा. चेअरमन मधुकर मोटे व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय घोणसे यांनी चेअरमन बापूराव पाटील, व्हाईस चेअरमन मधुकर मोटे, व सर्व संचालक हे बँकेस भाग भांडवलापोटी 68 कोटी, कारखान्याच्या थकहमी पोटी 234 कोटी व बँकेस सॉफ्ट लोन 200 कोटी मिळण्यासाठी प्रशासनाकडे प्रयत्न करीत आहेत. यासाठीचे सर्व प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक, विभागीय सहनिबंधक व सहकार आयुक्त कार्यालयाने त्यांचे सकारात्मक शेऱ्यासह बँकेस निधी उपलब्ध होण्यासाठी शासनाकडे पाठविला असून निधी लवकर उपलब्ध होणे अपेक्षित असल्याचे सभेस अवगत करून दिले.

नागरी बँका पतसंस्था यांचे व्यवहार पूर्वत बँकेमार्फत चालू करण्यासाठी बँकेने प्रयत्न करावे. बँकेचे कर्मचारी सध्या वसुली कामकाज करीत असून चालू बाकीदाराची वसुली झाल्यानंतर थकबाकीत गेलेल्या सभासदांच्या वसुलीसाठी बँक प्रयत्न करणार असल्याचे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय घोणसे यांनी पालक अधिकारी यांना अवगत करून दिले. शेवटी बँकेचे संचालक नानासाहेब पाटील यांनी चेअरमन यांना संचालकांनी किती रकमेच्या ठेवी ठेवायच्या याबाबत आदेश द्यावे, त्या आदेशानुसार सर्व संचालक बँकेत ठेवी ठेवतील असे पालक अधिकारी यांना आश्वासित केले. 

 
Top