धाराशिव (प्रतिनिधी) - यंदा मृग नक्षत्राच्या सरी मोठ्या प्रमाणात संपूर्ण जिल्ह्यात कोसळलेले आहेत. त्यामुळे सखल भागात पाणी साचत असून रस्ते खड्डेमय होत आहेत. शहरातील देशपांडे स्टँड परिसरातील कमान येथे मोठ मोठाले खड्डे पडले असून सार्वजनिक बांधकाम विभाग कोम्यात गेल्यासारखा वागत आहे. त्यामुळे नागरिकांनीच गांधीगिरी करीत दगडे टाकीत त्यामध्ये बेशरमाची झाडे उभे करून नागरिकांना सावधान! पुढे खड्डा व अपघात प्रवण क्षेत्र असल्यामुळे वाहने सावकाश चालवा व अपघात टाळा असा प्रतीकात्मक इशारा दिला आहे. 

धाराशिव शहरातील रस्ते पहिल्याच पावसाने उखडले आहेत. शहरातील प्रत्येक रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून त्या खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. धाराशिव शहरातील देशपांडे स्टॅन्ड येथील खाँजा - वैराग, तुळजापूर,सोलापूर, लोहाराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर कमानी जवळ रस्त्यावर मोठमोठे खड्डे गेल्या अनेक महिन्यापासून पडलेले आहेत. हे खड्डे बुजवण्यासाठी बांधकाम विभागाकडे नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या. मात्र बांधकाम विभाग आपल्या तोऱ्यात वागत आहे. त्यामुळे या खड्ड्यावरून दररोज ये जा करणाऱ्या हजारो वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरून वाहन चालवीत मार्ग शोधावा लागत आहे. या रस्त्यावरून चालताना आपण वाहनावरून जात नसून उंटावर बसून चाललो आहोत की काय ? असे नागरिकांना जाणवू लागले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या असून सांधेदुखी, मनका दुखी व इतर आजार या खड्ड्यामुळे जडत आहेत. तर याच खड्यामुळे एका वयस्कर आजींना आपला जीव गमावावा लागला आहे. त्याच्या निषेधार्थ प्रतीकात्मक खड्डे बुजून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी संकेत साळुंके, शहानवाज सय्यद, अस्लम मुजावर आदींसह देशपांडे स्टँड, इंगळे गल्ली,खाजा नगर भागातील अनेक नागरिक उपस्थित होते.

 
Top