परंडा (प्रतिनिधी) - सगेसोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. बुधवार (दि.12) उपोषणाच्या पाचव्या दिवशी धाराशिव जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत व धाराशिव शिवसेना जिल्हाप्रमुख तथा जि.प.माजी सभापती दत्ता साळुंके यांनी उपोषण स्थळी जाऊन मराठा आरक्षण सगेसोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या मागणीस लेखी पत्र देऊन जाहिर पाठिंबा दिला आहे.

पाठिंबा पत्रात म्हटले आहे कि, मराठा समाज पूर्वीपासून आरक्षणापासून वंचित असल्याने मराठा समाजातील तरुण-तरुणींना प्रत्येक क्षेत्रामध्ये अडचणींचा सामना करावा लागत आहे. मराठा समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेता त्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने सरकारने मराठा समाजास आरक्षण देणे आवश्यक आहे. तसेच मराठा समाज बांधवाला ओ.बी.सी. मध्ये कुणबी मराठा सगेसोयरे या शब्दाचा आंतरभाव करुन लाभ मिळणेसाठी मौजे आंतरवली सराटी येथे उपोषणाला बसलेले मराठा समाज आरक्षणाचे जनक मनोज जरांगे-पाटील यांचे मराठा आरक्षणास भूम, परंडा, वाशी तालुक्याच्यावतीने जाहीर पाठिंबा देत आहे. यावेळी मोठया संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

 
Top