धाराशिव (प्रतिनिधी) - पाच हजार वर्षांपासून दलित, बहुजन समाज अन्याय अत्याचार सहन करीत आला. त्यांना न्याय देण्यासाठी कोणीच पुढे येत नव्हते. परंतू 14 एप्रिल 1891 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचा तळपता प्रज्ञा सूर्य उगवला. पण आता प्रत्येकजण आपापल्या सोयीने भगवा, निळा, पिवळा, हिरवा, लाल व इतर रंगांत शुभ सकाळ असा संदेश पाठवित आहेत. या माध्यमातून महापुरुषांच्या पुतळ्याजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. ती गर्दी महापुरुषांच्या पुस्तकाजवळ आणणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विद्रोही कवी नितीन चंदनशिवे यांनी दि.22 मे रोजी केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत पुरोगामी चळवळ आणि आजचा युवक या विषयावर ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धाराशिव जिल्हा परिषदेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जरिचंद सावंत उपस्थित होते. पुढे बोलताना कवी चंदनशिवे म्हणाले की, वामनदादा कर्डक यांच्या विचाराशिवाय आंबेडकरी होऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. चळवळ ही राजकीय पुढारी किंवा पक्षामुळे जिवंत राहिली नसून ती शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा झोपडीत राहणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे जिवंत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी जरिचंद सावंत यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी भाई धनंजय पाटील, अमरसिंह देशमुख, सौरव बागल,  फिरोज पल्ला, पृथ्वीराज चिलवंत, सौरव शिंगाडे, दादासाहेब शिंगाडे,  भाग्यश्री केसकर, पंडित कांबळे, व्ही एस गायकवाड, बाळासाहेब मस्के आदींना विचार मंचच्यावतीने पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समितीचे सचिव प्रा. महेंद्र चंदनशिवे, पंडित कांबळे, नागनाथ गोरसे, प्रा. अंबादास कळासरे, मारोती पवार आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक प्रा. रवी सुरवसे यांनी तर सूत्रसंचालन राजेंद्र अंगरखे व उपस्थितांचे आभार प्रा. अंबादास कळासरे यांनी मानले. या कार्यक्रमास महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top