धाराशिव (प्रतिनिधी)-7 मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात 31 उमेदवार उभे असले तरी प्रमुख लढत मात्र महायुतीच्या अर्चना पाटील विरूध्द महाविकास आघाडीचे ओम राजेनिंबाळकर यांच्यात होत आहे. उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री अजीत पवार, दवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेनेचे नेते व माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, काँग्रेचे नेते अमित देशमुख यांनी मैदान गाजवले. त्यामुळे सुरूवातीच्या काळात एकतर्फी वाटणारी लोकसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात मात्र चुरशीचे होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा तालुक्यातील काही गावे, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी व पूर्ण उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश आहे. या मतदारसंघाची एकूण मतदान संख्या 20 लाख आहे. मतदारसंघात एकूण 2139 मतदान केंद्र आहेत. मतदानासाठी एकूण 2139 बॅरेट युनिट सज्ज करण्यात आले आहेत. या मतदारसंघात 6 विधानसभा मतदासंघाचा समावेश आहे. या मतदारसंघात 5 विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व महायुतीचे आमदार करीत आहेत. तर महाविकास आघाडीकडे 1 विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व व विद्यमान खासदार ओम राजेनिंबाळकर हे आहेत. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या मतदारसंघात जोर वाटत असला तरी महाविकास आघाडीचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर यांचा डायरेट मतदारांशी असलेला संपर्क यामुळे सुरूवातीच्या काळात ही निवडणूक एकतर्फी होते की काय असे वाटत होते. परंतु त्यानंतर महायुतीच्यावतीने विकासाचे काही मुद्दे मांडत खासदारांनी नेमके काय केले? असा प्रश्न उपस्थित केला. यावर ओम राजेनिंबाळकर यांनी 2014 ला सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे मार्गाची घोषणा झाली असताना 2019 पर्यंत काही झाले नव्हते. परंतु आपण 2019 ला खासदार झाल्यानंतरच या रेल्वे मार्गाच्या कामाला गती आली. असे म्हणत विरोधकांचा मुद्दा खोडून टाकला. 

महायुतीकडून शिंदे शिवसेनेचे पालकमंत्री तानाजी सावंत, आमदार ज्ञानराज चौगुले, भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार अभिमन्यू पवार, आमदार राजाभाऊ राऊत, माजी आमदार व भाजपमध्ये प्रवेश केलेले बसवराज पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, नितीन काळे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, प्रदेश सरचिटणीस सुरेश बिराजदार, महेंद्र धुरगुडे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ, संजय बनसोडे आदींनी खिंड लढविली. महाविकास आघाडीच्यावतीने ठाकरे शिवसेनेचे ओम राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, दिलीप सोपल, मकरंद राजेनिंबाळकर, शिवाजी कापसे, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, माजी आमदार राहुल मोटे, संजय पाटील दुधगावकर, प्रतापसिंह पाटील, सक्षणा सलगर तर काँग्रेसचेच्या वतीने जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज पाटील, माजीमंत्री मधुकर चव्हाण यांच्यासह काही नेत्यांनी प्रचाराची धुरा संभाळली. 


 
Top