धाराशिव (प्रतिनिधी)- मे महिन्यात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. वाढत्या तापमानामुळे प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवनही वाढले आहे. शिवाय महावितरणकडून होत असलेला वीज पुरवठाही वारंवार खंडीत होत आहे. परिणामी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला जलकुंभात पाणी सोडण्यास विलंब होत आहे. त्यामुळे आता पालिकेकडून 6 ऐवजी 9 दिवसाला पाणीपुरवठा केला जात आहे. भविष्यात पाऊस लांबल्यास शहरवासियांना आणखी तीव्र पाणी टंचाईस तोड द्यावे लागणार आहे.

धाराशिव शहरातील उजनी व तेरणा प्रकल्पातून पाणीपुरवठा होत आहे. वाढत्या उन्हामुळे आता प्रकल्पातील पाणी साठ्यात झपाट्याने घट होवू लागली आहे. उजनीचे जॅकवेल आता उघडे पडले आहेत. तेरणा प्रकल्पातही जूनपर्यत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. शहरातील काही भागातील बोअरवेल बंद पडले आहेत. काही भागात उचक्या मारत पाणी येत आहे. त्यातच पंपगृहांना महावितरणकडून होत असलेला वीजपुरवठाही वादळी वाऱ्यामुळे खंडीत होत आहे. शहरातील जलकुंभ भरण्यासही वेळ लागत आहे. अनेक भागातील नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. मान्सूनचा पाऊस लांबल्यास भविष्यात यापेक्षाही भीषण पाणीटंचाई जाणवू शकते. त्यामुळे पालिकेकडून  काटकसरीने पाणीपुरवठा करण्यावर आता भर दिला आहे. शहराचा पाणीपुरवठा 6 ऐवजी 9 दिवसांवर करण्यात आला आहे.

 
Top