भूम (प्रतिनिधी)-शासनाच्या धोरणानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आणि अनुदानित शाळांमधील इयत्ता 1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरीत करण्यात येतात.

नवीन शैक्षणिक वर्षासाठी भूम तालुक्यात गटशिक्षण कार्यालयाकडे बालभारती संस्थेने एकूण 51750 पाठयपुस्तके पाठवली असून ती पाठयपुस्तके उतरवून सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. इ.1 ली ते 8 वी मधील सर्व विद्यार्थ्यांना नियमानुसार ही पाठयपुस्तके वितरीत केली जाणार आहेत. दिनांक 15 जून 2024 रोजी नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत आहे त्यापूर्वी ही सर्व पाठयपुस्तके शाळांमध्ये पोहच करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

शाळेत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती नवीन पाठ्यपुस्तके असतील. शाळांमधून प्रवेशोत्सव साजरा करुन मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना वितरीत करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार शाळांमधून कार्यवाही करण्यात येईल.

तालुकास्तरावर प्राप्त पाठ्यपुस्तकांचे विद्यार्थी संख्येनुसार तालुक्यातील एकूण 9 केंद्राच्या केंद्रीय शाळेत प्रथम वितरण करण्यात येईल त्यानंतर केंद्रस्तरावरुन सर्व पात्र शाळांना केंद्रप्रमुख व केंद्रीय मुख्याध्यापक यांच्यामार्फत शाळांपर्यंत पाठयपुस्तकांचे वितरण करण्यात येते. प्रत्येक विद्यार्थ्यांला शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके देण्यात येतील. त्यामुळे सर्व पालकांनी शाळेच्या पहिल्याच दिवसापासून आपल्या पाल्यास शाळेत नियमित उपस्थित ठेवावे. असे अवाहन गटशिक्षणाधिकारी राहूल भट्टी यांनी केले.

 
Top