तुळजापूर (प्रतिनिधी)-शिक्षकांनी जमा केलेला कोविड निधी जिल्हा परिषदकडे वर्ग करून तुळजापूर येथे शिक्षक भवन बांधण्याची मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

कोरोना काळात सन 2021 मध्ये धाराशिव येथे ऑक्सिजन प्लांट उभारण्या साठी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी आपले एक दिवसाचे वेतन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या बँक खात्यावर जमा केलेले होते. परंतु तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी लोकप्रतिनिधी व समाजातील दानशूर व्यक्तीच्या सहकार्यातून ऑक्सिजन प्लांट निर्माण केल्यामुळे शिक्षकांनी जमा केलेला निधी आज तागायत खर्च न होता तसाच जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या बँक खात्यावर तसाच शिल्लक पडून आहे.  2021 मध्ये 87 लाख रुपये असणारा हा निधी आज व्याजासह 95 लाखापेक्षा जास्त झालेला आहे. सदर शिल्लक निधीच्या विनियोगासंदर्भात तत्कालीन जिल्हाधिकारी व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व शिक्षक संघटनांची बैठक होऊन जमा असलेल्या कोविड निधीतून तुळजापूर या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या जागेमध्ये शिक्षक भवन बांधण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 

परंतु अद्यापपर्यंत हा निधी जिल्हा परिषदकडे वर्ग झालेला नसल्यामुळे जमा निधी जिल्हा परिषदकडे तात्काळ वर्ग करून बैठकीतील झालेल्या निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या नियंत्रणाखाली तुळजापूर या ठिकाणी शिक्षक भवन बांधकाम करावे. अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हा शाखेच्या वतीने राज्य उपाध्यक्ष लालासाहेब मगर,  राज्य नेते बशीर भाई तांबोळी, राज्य महिला प्रतिनिधी सविताताई पांढरे  जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, जिल्हा सरचिटणीस अविनाश मोकाशे, नगरपालिका विभाग जिल्हाप्रमुख राजेंद्र पवार, जिल्हा कार्यालय चिटणीस महेबूब काझी यांनी जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.


 
Top