तुळजापूर (प्रतिनिधी) - तिर्थक्षेञ तुळजापूर  शहरासह ग्रामीण भागात सिमेंट रस्ते मोठ्या संखेने केल्यामुळे जमीनीत पाणी मुरत नसल्याने उन्हाळ्यात सिमेंट रस्ते तापुन उष्णतेत वाढ होत आहे. त्याचा फटका भाविक, नागरिक यांना बसत आहे. तिर्थक्षेञ तुळजापूर शहरात पुर्वी चिंचेचे वृक्ष मोठ्या प्रमाणात असल्याने  तिर्थक्षेञ  तुळजापूरला चिंचपूर म्हणून संबोधले जात होते. कालांतराने या तिर्थक्षेञाचा विकास होत गेला. पण विकास करताना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड न करता  फक्त कोट्यावधी रुपयाचे सिमेंट रस्ते तयार केल्याने  या सिमेंट  काँक्रीटच्या रस्त्यांमुळे उष्णतेत वाढ होत आहे. परिणामी दुपारी तिर्थक्षेञ तुळजापूर चांगलेच तापत जात असल्याने यामुळे भाविक, नागरिकांना असाह्य उष्णतेचा ञास सहन करावा लागत आहे.

सध्या अनेक गावांत रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले आहे. गावागावांत, गल्लीबोळातही काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. परिणामी, डांबरी रस्ते कालबाह्य होऊ लागले आहेत. काँक्रीटच्या रस्त्यांमुळे उष्णतेत वाढ होत आहे. रस्ते दुपारी मोठ्या प्रमाणात तापले जातात. त्यातून उष्णता बाहेर पडते. तापलेल्या रस्त्यांमुळे उष्णतेची दाहकता अधिकच जाणवते. लाखो रुपये खर्च करूनसुद्धा हे रस्ते फारसे टिकाऊ नसून, उष्णतेत वाढ निर्माण करणारे आहेत. म्हणून शासनाने काँक्रीटीकरण रस्त्यावर भर देण्यापेक्षा डांबरीकरण रस्त्यावर अधिक भर द्यावा, असे नागरिकांचे मत आहे.


 
Top