धाराशिव (प्रतिनिधी) -प्रेम, भक्ती, राजकारण, स्त्रीविषयक जाणिवा, निसर्ग, शेती आणि शेतकरी, अशा विविध विषयांवरील भावगर्भ आशयांच्या गझलांनी धाराशिवकरांची मने जिंकली. मराठी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मराठवाडा साहित्य परिषदेच्या धाराशिव शाखेच्यावतीने आयोजित करण्यात आलेला गझल पाडवा चांगलाच रंगला. दोन तासांहून अधिक वेळ रसिकश्रोत्यांनी मंत्रमुग्ध होवून दर्जेदार गझलांचा आनंद घेतला.

शहरातील भानुनगर परिसरात असलेल्या सांस्कृतिक सभागृहात मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीने गझल पाडवा या गझल मुशायऱ्याचे आयोजन केले होते. प्रारंभी गझलसम्राट सुरेश भट यांच्या स्मृतींना वंदन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. जिल्ह्यात साहित्य चळवळ अधिक प्रभावीपणे पुढे घेवून जाण्यासाठी अशा दर्जेदार कार्यक्रमांच्या आयोजनासाठी मसाप सातत्याने प्रयत्नशील असल्याचे मसापचे अध्यक्ष नितीन तावडे यांनी यावेळी नमुद केले. कार्यक्रमात ज्येष्ठ गझलकार राजेंद्र अत्रे, योगीराज माने यांच्यासह युवराज नळे, भागवत घेवारे, अनिल ढगे, युसुफ सय्यद, गणेश मगर, कृष्णा साळुंके, श्रीपती जमाले, मधुकर हुजरे, विजयकुमार बारसकर, स्नेहलता झरकर, मनीषा पोतदार, विद्या देशमुख, अनिता पडवळ, सारीका देशमुख आणि रेखा ढगे आदी गझलकारांनी दर्जेदार गझलांचे सादरीकरण करीत उपस्थित रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळविली. मुशायऱ्याच्या अध्यक्षस्थानी प्रसिध्द गझलकार बाळ पाटील हे होते. तर समन्वयक म्हणून मनीषा पोतदार व भागवत पोतदार यांनी जबाबदारी पार पाडली. वेलनेस कोच दयानंद सर यांनी कार्यक्रमासाठी सभागृह उपलब्ध करून दिले. मसापचे कोषाध्यक्ष माधव इंगळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. प्रास्ताविक नितीन तावडे, निवेदन शाम नवले तर शेवटी आभार डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी मानले.


 
Top