धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. 12) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश भागात विजांच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. उमरगा, लोहारा तालुक्यातील अनेक गावांमध्ये गारपीट झाल्यामुळे फळबागांसह शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील अनेक शिवारात रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, कांदा, तूर व इतर पिकांना मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे आंबा, द्राक्ष, केळी, टरबुज या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तर अनेक गावांमध्ये घरांवरील पत्रे वादळात उडून गेल्यामुळे गोरगरीब शेतकरी, शेतमजुरांचा संसार उघड्यावर पडला आहे. अशा परिस्थितीत अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज आहे.

यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे पाणीटंचाईचे सावट गडद झालेले आहे. जेमतेम पाण्यावर कशीबशी जगविलेली पिके अवकाळी तडाख्यात सापडल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. आधीच दुष्काळी परिस्थितीने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे अवकाळीमुळे अवसान गळाले आहे. या संकटातून सावरण्यासाठी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, जिल्हा संपर्कप्रमुख शहाजी सोमवंशी, विजय सिरसट, नागनाथ सुरवसे, पार्थ भोईटे यांची स्वाक्षरी आहे.


 
Top