तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील धनेगांव हे 1993च्या भुकंपात उध्दवस्त झाले असुन अजुन ही या गावचे पुर्नवसन न केल्याने धनेगाव  भुकंपग्रस्त ग्रामस्थांनी आगामी लोकसभेच्या लोकशाहीच्या उत्सवावर मतदान न करुन बहिष्कार घालण्याचे निवेदन जिल्हाधिकारी धाराशिव यांना दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, 1993  साली किल्लारी येथे झालेल्या भुकंपामुळे मौजे धनेगांव येथील घरांची मोठ्या प्रमाणात नासधुस होऊन संपुर्ण गाव बेचीराख झाले होते. या कारणामुळे गावातील लोक मौजे धनेगांव येथील प्रतिष्ठीत नागरीक प्रकाश गुणवंतराव देशमुख यांच्या मालकीच्या गट नं. 30 क्षेत्र 02 हे. 60 आर या क्षेत्रावर येऊन वास्तव्य राहीले. गावातील प्रतिष्ठीत नागरिकांच्या संमतीने व गावातील लोकांच्या मागणीमुळे संपुर्ण गाव हे गट नं. 30 मध्ये वसले. त्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी, सभागृह, पाणी पुरवठा योजना, सिमेंट रस्ते, इंदिरा आवास योजने अंतर्गत दलीत व इतर समाजातील लोक घरे बांधुन शासकीय योजनेचा लाभ घेतलेला आहे. परंतु धनेगांवचे पुनर्वसन न झाल्यामुळे सद्यस्थितीत 7/12 उताऱ्यावर गट नं. 30 ही जमीन प्रकाशराव गुणवंतराव देशमुख यांच्या मालकीचीच असल्यामुळे आमची घरे ही आमच्या नावे झालेली नाहीत. 

किल्लारी भुकंप होऊन 30 वर्षे होऊन गेली आहेत. तरीही आजपर्यंत गावाचे कायदेशीर व प्रशासकीय पुनर्वसन झालेले नाही. सन 1990 पर्यंत कुंभारी धनेगांव ही ग्रुप ग्रामपंचायत होती. त्यानंतर धनेगांव ही स्वतंत्र ग्रामपंचायत उदयास आली. आजपर्यंत ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध करून गावाने वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. तसेच 4 मे 2007 रोजी तत्कालीन महामहिम अब्दुल कलाम यांच्या व्दारे निर्मल ग्राम पुरस्कारही प्रदान करण्यात आला. धनेगाव ग्रामपंचायत ही आदर्श ग्रामपंचायत म्हणुन ओळखली जाते. आमच्या गावाचे प्रशासकीय पुनर्वसन व्हावे म्हणुन सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला होता. तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत याही निवडणुकांवर आज पर्यंत बहिष्कारच आहे.

या प्रश्नावर आम्ही ग्रामस्थांनी तत्कालीन महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष व जेष्ठ नेता हरीभाऊ बागडे यांना भेटुन आमच्या मागण्या मांडल्या. त्याला अनुसरून बागडे यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून या विषयाला चालना देण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात संबंधीत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सदरील विषयामध्ये लक्ष घालुन तात्काळ आवश्यक कार्यवाही करणे बाबत संबंधीत अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. त्यानंतर उपजिल्हाधिकारी, धाराशिव यांनी मौजे धनेगांव येथील जमीनीची मोजणी करून शाळा, अंगणवाडी, रस्ता, नाली, प्लॉट वाईज घरे, सभागृह, मंदिर, इ. असलेल्या क्षेत्राची मोजणी करून प्रत्येक मालमत्तेचे क्षेत्रफळ काढुन पाहिले असता ते क्षेत्र 02 हे. 60 आर असल्याचे कळले. 

जिल्हाधिकारी यांच्याकडुन, विभागीय आयुक्त यांच्या मार्फत अप्पर मुख्य सचिव महसुल व वनविभाग (मदत व पुनर्वसन) मंत्रालय, मुंबई यांच्याकडे शासन स्तरावर पुनर्वसना बाबत सन 2018 रोजी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. परंतु 2021 मध्ये मंत्रालय स्तरावरून भुकंप पुनर्वसन व विस्तार वाढ' या योजनेमध्ये धनेगांवचे पुनर्वसन करता येत नसल्याबाबत जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आले. 

जिल्हाधिकारी स्तरावर या बाबत योग्य तो निर्णय घ्यावा असे पत्रात नमुद करण्यात आले आहे. परंतु या नंतर 3 वर्ष झाले तरी आपल्या स्तरावरून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही म्हणुन ग्रामस्थांनी मिटींग घेऊन लोकसभा निवडणुक 2024 वर बहीष्कार कायम ठेवण्याचे एकमताने ठरवले आहे.

या निवेदनावर अनिल काशिनाथ चुनाडे, शिवाजी दादाराव सुरवसे, अकुंश  नारायण सुरवसे, अर्जुन  ज्ञानोबा  सुरवसे, अर्जुन मारुती पारधे या पाच माजी सरपंचासह भुकंपग्रस्त ग्रामस्थांच्या स्वाक्षरी आहेत.


 
Top