उमरगा (प्रतिनिधी) - देशाचे भवितव्य घडवणारी ही निवडणूक आहे. लोकसभेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अतिशय विचारपूर्वक गांभिर्याने या निवडणुकीकडे पाहणे गरजेचे आहे. या निवडणुकीत देशाला तारणारा विचार, देशाला आवश्यक नेतृत्व निवडणे आवश्यक आहे. नरेंद्र मोदी यांच्या रुपाने देशाला अतिशय खंबीर नेतृत्व मिळाले आहे. संरक्षण, आरोग्य, शिक्षण, आर्थिक सक्षमीकरण, परराष्ट्र निती यावर उत्कृष्ट काम करुन मोदींनी जगात देशाची प्रतिमा उंचावली आहे. नेतृत्व मजबूत मिळाल्याशिवाय देश सुरक्षित रहात नाही. आपल्या देशाला मोदीसारख्या कनखर नेतृत्वाची गरज आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी, देशाला महासत्तेकडे घेऊन जाण्यासाठी महायुतीला मतदान करणे आवश्यक असल्याचे मत माजी मंत्री बसवराज पाटील यांनी व्यक्त केले.

भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय व मित्र पक्षाचे उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचाराची दिशा ठरवण्यासाठी उमरगा येथे महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची सोमवारी सायंकाळी उमरगा येथे बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी अध्यक्षस्थावरुन ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण. चंद्रकांत महाजन, दत्ता कुलकर्णी, जितेंद्र शिंदे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य आदीसह भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
Top