कळंब (प्रतिनिधी)- साईनगरचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी नागरिकांचा महावितरण कार्यालयात दि. 27 रोजी सायंकाळी पाच पासून तब्बल चार तास ठिय्या मांडून अधिकाऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी व पाणीपुरवठ्याच्या नियमाप्रमाणे बिल भरून घेण्यासाठी नागरिकांनी धारेवर धरले ! आंदोलनाचे उग्ररूप पाहताच अधिकाऱ्याची धावपळ उडाली व वीज पुरवठा सुरळीत करण्याचे रात्री आठला आदेश दिले. अखेर सार्वजनिक पाणीपुरवठ्याप्रमाणेच बिलआकारणी करून भरून घेतले.  या आक्रमक आंदोलनामुळे वीज वितरण कार्यालयात मोठी खळबळ उडाली. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की साईनगर चा सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या बोरच्या वीज बिल अवाच्या सव्वा अकारणी  संदर्भात नागरिकांनी कोर्टात न्याय मागणी करताच न्यायालयाने मनाई आदेश दिला पण न्यायालयाचा आदेशही महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी झुगारून कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली एक नाही तर दोन वेळा दाखवून वीज पुरवठा अखेर सुरळीत केलाच नाही. अशा कामचुकार व मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून पुन्हा न्यायालयात केली आहे. न्यायालय या अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

 कळंब शहरातील प्रतिष्ठित समजली जाणारी साईनगर हाऊसिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटी चा सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या बोरचा महावितरणाने वीज पुरवठा खंडित केला आहे.  हे विज बिल अव्वाच्या सव्वा आकारणी केली. या बिलासाठी साई नगरीने कोर्टात धाव घेऊन 22 मध्ये दावा दाखल केला होता. या दाव्यात न्यायालयाने 21  ऑक्टोबर 22 रोजी दाव्याचा निकाल लागेपर्यंत साईनगरचा वीजपुरवठा खंडित करू नये असे मनाई हुकूमचा आदेश महावितरणाला दिला होता.  यावर साईनगर मार्फत महावितरणाला अनेक वेळा पत्र व्यवहार करूनही पूर्वीप्रमाणे विज  बिल आकारणी करून द्या आम्ही बिल भरण्यास तयार आहोत पण महावितरणाने पत्राची दखल न घेता आपला मनमानी कारभार करून शेवटी अधिकाऱ्यांनी 19  मार्च रोजी साईनगरचा वीजपुरवठा खंडित केला. कोर्टाच्या आदेशाचा अवमान केला व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा यासाठी साईनगर ने पुन्हा  कोर्टात धाव घेतली. यावर न्यायालयाने दोन्ही बाजूचा ऐकून वीज पुरवठा सुरळीत करावा असे आदेश न्यायालयाने 22 मार्च रोजी दिले. परंतु हा या आदेशाची महावितरणाने पायमल्ली करत अजूनही म्हणजे 27  मार्च पर्यंत वीज जोडणी केलीच नाही. शेवटी साईनगर मधील रहिवासी वैतागून महावितरणाच्या कार्यालयात सायंकाळी पाच वाजता धाव घेऊन कार्यालयातच ठिय्या मांडला. आंदोलनाचे उग्ररूप पाहताच अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली व काही सभासदाच्या मध्यस्थीने या आंदोलनात तोडगा काढून संध्याकाळी आठ वाजता वीज पुरवठा सुरळीत केला. या अशा कामचुकार अधिकाऱ्यामुळे साईनगर भागातून या अधिकाऱ्याविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे व नगरपरिषदेचा पाणीपुरवठा साईनगर भागात नसल्यामुळे साईनगर वाशियांची पाण्यासाठी वन वन भटकंती सुरू आहे. सध्या पाण्याची कळंब शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाई असल्यामुळे व  पाणीपुरवठा करणाऱ्या बोरचा महावितरणाने वीज पुरवठा खंडित केल्यामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला आहे.  या अधिकाऱ्याविरोधात न्यायालयात पुढे काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

            

याबाबत साईनगरवाशीयांनी लोकप्रतिनिधी आमदार, खासदार यांनाही याबाबतची विनंती करूनही त्यांनी याकडे पाठ फिरवल्याने नागरिकांतून यांच्या विषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या निवडणुकीत लोकप्रतिनिधींना धक्का देणार अशी चर्चा साईनगर मधून जोर आहे. जो देता वही आमचा नेता अशी घोषणा साईनगरवाशियांनी केली आहे. 


सर्व साईनगर वाशी यांच्या वतीने न्यायालयात ॲड. डी. एस. पवार हे बाजू मांडत आहेत. 


कोर्टाच्या आदेशालाही महावितरणाकडून केराची टोपली, वीज खंडित करू नका म्हणून आदेश असतानाही वीज पुरवठा तोडला. नागरिक पुन्हा कोर्टात अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी!


 
Top