धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील सामान्य नागरीक व तरुण पिढीला स्थानिक लोककला, संस्कृती,पर्यटन आणि इतिहासाची माहिती व्हावी तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलाकारांच्या कलागुणांना बघण्याची मेजवाणीच राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना उपलब्ध करून दिली याबद्दल राज्य शासनाचे मनापासून आभार मानतो. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी  महासंस्कृती महोत्सवाच्या उद्घाटना प्रसंगी केले. 

यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी,सिनेअभिनेते भरत जाधव, साहित्यिक युवराज नळे,नाटककार विशाल शिंगाडे,अपर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे,निवासी उपजिल्हाधिकारी शोभादेवी जाधव,उपजिल्हाधिकारी संतोष भोर,शिरीष यादव,जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांची  प्रामुख्याने उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन आणि नटराजाच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आले. याप्रसंगी जिल्ह्यातील साहित्यिक, कलावंत आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते.याप्रसंगी मान्यवरांनी महिला बचत गटांकडून लावलेले विविध स्टॉल,सांस्कृतिक व पर्यटन तसेच पुरातत्व विभागाचे प्रदर्शन स्टॉल अशा विविध स्टॉलची पाहणी केली.

जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन आजपासून ते 4 मार्चपर्यंत करण्यात येणार आहे.स्थानिक कलाकारांना त्यांच्या कलागुणांना या पाचदिवशीय महासंस्कृती महोत्सवात प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून या कालावधीत दुपारच्या सत्रात वेगवेगळे कलाप्रकार सादर केले जाणार आहेत.यासर्व कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळणार असून त्यांना मानधनही देण्यात येणार आहे. तेंव्हा नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यासर्व कलावंतांना व बचतगटातील महिलांना प्रोत्साहीत करावे,असेही ते म्हणाले. 

तत्पूर्वी आज दुपारी सतीश महामुनी, वाघ आणि संस्कारभारती यांच्या चमूने गोंधळ नृत्य, सावित्रीबाई राठोड यांच्या संघाने बंजारा नृत्य, शाहीर माया भोसले यांनी धनगरी ओव्या,कृष्णाई उळेकर यांचे भारुड तर विशाल शिंगाडे यांच्या संघाने दिंडी नृत्य सादर केले.बालशाहीर अविष्कार येडके यांच्या पोवाड्याचा मनसोक्त आनंद घेतला.

रात्री प्रख्यात सिनेअभिनेते भरत जाधव यांच्या मोरुची मावशी या नाटकाचा उपस्थित धाराशिवकरांनी मनसोक्त आनंद लुटला.नाटकातील गितांचा आस्वाद घेतानाच ऐकापेक्षा एक पंच आणि विनोद ऐकून धाराशिव नगरीतील प्रेक्षक पोट धरुन हसले. नाटक पाहण्यासाठी महिला, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि नागरीक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.


 
Top