धाराशिव (प्रतिनिधी)-येथील तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय हे यांच्या आमदार राणाजगजितसिंह पाटील मार्गदर्शनाखाली नेहमीच जिल्ह्यातील युवकांसाठी रोजगार आणि उद्योगजगत या मध्ये सतत युवकांना आत्मनिर्भर  बनवण्यासाठी मदत करत आहे. याच संदर्भात आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव आणि भारतीय युवा शक्ती ट्रस्ट   पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने  दोन दिवसीय  मार्गदर्शक विकास कार्यक्रम हॉटेल पुष्पक पार्क येथे दिनांक 6 व 7 मार्च, 2024 रोजी आयोजित केला होता. जिल्हास्तरावर जास्तीत जास्त उद्योग निर्मितीसाठी मार्गदर्शक तयार करून युवकांना नवीन उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या मूळ कार्यक्रमाचा उद्देश होता.

उद्योग चालू करून तो स्थिर होण्यापर्यंत ज्या काही अडचणी येतात त्या सोडविण्यासाठी  मार्गदर्शन  या कार्यक्रमात करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी अभियांत्रिकी, कृषी, कला, विज्ञान, व फार्मसी या विविध क्षेत्रातील प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. यावेळी बीवायएसटीचे मार्गदर्शक राम शेंडे म्हणाले की, वर्ड शब्द हे जगाला बदलू शकतात. त्यामुळे आपण कशा पद्धतीने शब्दांचा वापर करतो त्यावर बरेचसे यश अवलंबून आहे. जोपर्यंत तुम्ही कुठल्याही क्षेत्रात झोकून देऊन काम करत नाहीत तोपर्यंत यश सहजासहजी मिळत नाही. आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये कुठलीही गोष्ट करताना ती कशासाठी ? हा प्रश्न निर्माण झाला पाहिजे.  ही एक ना नफा ना तोटा या तत्वावर चालणारी  संस्था आहे. जी मुख्यत्वे वंचित भारतीय तरुणांना व्यावसायिक कल्पना विकसित करण्यासाठी मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखाली व्यवहार्य उपक्रमांमध्ये मदत करते. ज्याचा मुख्य उद्देश नोकरी शोधणाऱ्यांना निर्माते बनवणे आहे. मार्गदर्शक आणि संस्थापक अध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या जीआरडी टाटा सारख्या दिग्गजांच्या पाठिंब्याने आणि मार्गदर्शनाने ची स्थापना पहिल्यांदा नवी दिल्लीत येथे 1992 ला स्थापना झाली.  ने बजाज ऑटो, टाटा स्टील, जेके पेपर आणि आयएफसीआय सोबत भागीदारी केली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र, ओडिशा आणि एनसीआर मध्ये विस्तार केला आहे. उद्योगासाठी मार्गदर्शक बनायचे असेल तर त्यासाठी लागणारी कौशल्य काय असावेत आणि ते कसे विकसित करावेत या विषयांचे सखोल ज्ञान प्रशिक्षक राम बेंडे यांनी दिली. 

कार्यशाळेसाठी  डॉ. अंबड, रोशन अहिरे हे उपस्थित होते. “जिल्ह्यातील जे युवक उद्योग चालू करू इच्छितात त्यांना हे मार्गदर्शक नक्कीच मार्गदर्शन करतील “असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी मत व्यक्त केले. धाराशिव मधील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, तेरणा महाविद्यालय, गव्हर्नमेंट पॉलीटेकनिक, व्यंकटेश महाजन महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठ सबकॅम्पस, जिल्हा उद्योग केंद्र धाराशिव, छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय संभाजी नगर आणि इतर यांचे प्रतिनिधी असे सर्व मिळून 60 प्रतिनिधी उपस्थित होते. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष.डॉ. पद्मसिंह  पाटील संस्थेचे विश्वस्त तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील, मल्हार पाटील आणि महाविद्यलयाचे समन्व्यक प्रा. गणेश भातलवंडे  यांनी कार्यशाळेत प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थीचे कौतुक केले.


 
Top