धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला मिळावा यासाठी धाराशिवचे शिष्टमंडळ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुक्रवारी रात्री मुंबईत भेटले. धाराशिव लोकसभा मतदारसंघावर शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनीही दावा केल्यामुळे धाराशिव लोकसभा मतदारसंघ वादग्रस्त बनला आहे. त्यामुळे भाजपाच्या शिष्टमंडळाने तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेवून धाराशिव लोकसभा मतदारसंघ भाजपला सोडण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे शनिवार दि. 30 मार्च रोजी मिळालेल्या माहिती नूसार धाराशिव लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना ही जागा सुटल्याची माहिती मिळाली आहे.

गेल्या काही वर्षापासून धाराशिव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना दोघांचीही ताकद वाढली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे ओम राजेनिंबाळकर सव्वा लाख मतांनी निवडून आले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांचा पराभव केला होता. 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व पक्षाचे संर्दभ बदलले आहेत. त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली आहे. भाजप एकसंघ असल्यामुळे भाजपाला जागा सोडण्याची मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, नितीन काळे, बसवराज मंगरूळे, दत्ता कुलकर्णी, सुधीर पाटील, विनोद गपाट, नेताजी पाटील, गुलचंद व्यवहारे आदींनी केली आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेसचा संभाव्य उमेदवार

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यावतीने जिल्हा बँकचे माजी अध्यक्ष सुरेश बिराजदार, शिक्षक मतदारसंघातील आमदार विक्रम काळे, पदवीधर मतदारसंघातील आमदार सतीश चव्हाण यांचे नाव पुढे आले असून, दुसरा एक प्रस्ताव पुढे आहे. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधील भूम, परंड्याचे माजी आमदार राहुल मोटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात घेवून लोकसभेची उमेदवारी द्यावी असाही प्रयत्न चालू आहे. 


 
Top