परंडा (प्रतिनिधी) - करमाळा रोड जवळील शहरातील काशीमबाग वस्तीवर घराबाहेर  झोपलेल्या शेतकरी रामा अभिमान भानवसे (माळी) (वय 50 वर्ष ) यास अज्ञात चोरट्यांनी गुरुवार दि.15 फेब्रुवारी रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास धारदार शस्त्राने हल्ला करून डोक्यात घाव घालून जीवघेणा हल्ला केला आहे. ते घराबाहेर वाळत टाकलेल्या गहू धान्यास राखणीसाठी पलंगावर झोपले होते. 

झोपेतच त्यांच्यावर हा हल्ला झाला. चोरटे गेल्यानंतर त्यांनी घरात झोपलेल्या कुटूंबीयांना जागे केले. रक्ताने माखलेल्या रामा यांना पाहिल्याने कुटुंबिय घाबरले व आरडाओरड केली. शेजारील नागरिक जागे झाले व त्यांना रुग्णालयात घेवून गेले. यामध्ये शेतकरी रामा भानवसे यांचा रक्तस्राव झाल्याने ते गंभीर असून त्यांच्यावर परंडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी बार्शी येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान करमाळा रोड लगत असलेल्या पत्रकार सुरेश घाडगे यांच्या शेतात वास्तव्यास असलेल्या ऊसतोडी कामगार टोळीच्या कोपीचा कपडा कापून अंदाजे दहा हजार किंमतीचा मोबाईल चोरून नेहला आहे. हि घटना पहाटे 3 वाजण्याच्या सुमारासस घडली आहे. या घटनांमुळे परिसरातील नागरिकांत भिती निर्माण झाली आहे. या अज्ञात चोरट्यांचे पाकीट घटनास्थळी सापडले असून, या चोरट्यांचा तात्काळ तपास लाववा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.


 
Top