धाराशिव (प्रतिनिधी) - मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण देण्यात येऊ नये यासाठी ओबीसी समाजामध्ये प्रचंड असंतोष खदखदत असून तीव्र विरोध दर्शविला जात आहे. त्यामुळे या संदर्भात शासन दरबारी योग्य बाजू व भूमिका मांडून न्याय तोडगा निघावा. तसेच शासनाने मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे या मागणीसाठी धाराशिव येथील ओबीसी शिष्ट मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ओबीसी समाजाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांची मुंबई येथील त्यांच्या बंगल्यावर भेट घेऊन दि.1 फेब्रुवारी रोजी सविस्तर चर्चा केली. दरम्यान, उद्या दि.3 फेब्रुवारी रोजी नगर येथील महाएल्गार मेळाव्यासाठी राज्यभरातील ओबीसी बांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भुजबळ यांनी केले आहे.
ओबीसी आरक्षण संदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी धाराशिव जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी मुंबई येथे बोलवले होते. यावेळी मंत्री भुजबळ यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच मुख्य समन्वयक शब्बीर भाई अन्सारी, माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासोबत चर्चा करण्यात येऊन प्रत्येकांचे म्हणने ऐकुन घेतले. तर दि.9 फेब्रुवारीपासून मराठवाड्यात ओबीसी महाएल्गार पदयात्रा निघणार आहे. या बैठकीस बारा बलुतेदार महासंघाचे राज्य उपाध्यक्ष धनंजय शिंगाडे, कळंबचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग कुंभार, नाभिक समाजाचे लक्ष्मण माने, माळी समाजाचे राजाभाऊ माळी, गोसावी समाजाचे अभिजित गिरी, मुजावर समाजाचे इलीयस मुजावर, परीट समाजाचे हरिदास शिंदे, धनगर समाजाचे विश्वंभर मैदाड, लिंगायत समाजाचे शिवानंद कथले, घिसाडी समाजाचे संजोग पावर, भावसार समाजाचे मिलिंद चांडगे भावसार आदी उपस्थित होते. भुजबळ यांनी धाराशिव जिल्ह्यातील सर्व ओबीसी, व्हीजेएनटी, एससी व एसटी समाज बांधवांनी दि.3 फेब्रुवारी रोजी नगर येथील होणाऱ्या एल्गार सभेस लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे. तसेच जिल्ह्यातून जास्तीत जास्त हरकती दाखल करून घेण्यावर भर द्यावा असे आवाहन भुजबळ यांनी केले.