धाराशिव/भूम (प्रतिनिधी)- राहुरी येथील आढाव वकील दाम्पत्य अपहरण व हत्येच्या निषेधार्थ भूम व धाराशिव वकील मंडळाच्या वतीने दि. 29 सोमवार रोजी काम बंद ठेवण्यात आले. यावेळी वकील मंडळाच्या वतीने ठराव घेऊन त्यासंबंधीची माहिती न्यायालयात देण्यात आली. त्यानंतर धाराशिव जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष रविंद्र कदम यांच्यासह वकील मंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तर भूम वकील मंडळाने उपविभागीय अधिकारी कार्यालय भूम येथे निवेदन देण्यात आले. 

आढाव दाम्पत्य यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावे, विधिज्ञावर वारंवार हल्ले होत असून विधिज्ञ संरक्षण कायदा करण्यात यावा, विधिज्ञाना शस्त्र परवाना देण्यात यावा, पीडित विधिज्ञ यांच्या परिवारास आर्थिक मदत देण्यात यावी व राज्यातील विधिज्ञ बांधवाना 25 लाखांचे विमा संरक्षण देण्यात यावे अशा आशयाचे निवेदन यावेळी देण्यात आले. उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे वतीने अव्वल कारकून अश्विनकुमार कांबळे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी भूम वकील मंडळाचे अध्यक्ष ॲड. नागनाथ बाबर, ॲड.सचिव पाशा शेख, सहसचिव ॲड. दत्तात्रय चिकने, सदस्य ॲड. पंडित ढगे, ॲड. शिवाजी ढगे, ॲड. अरविंद हिवरे, ॲड. सदाशिव गुंजाळ, ॲड. रामराजे साळुंके, ॲड. स्वप्नील आगळे, ॲड. बाळासाहेब मोटे उपस्थित होते.


 
Top