धाराशिव (प्रतिनिधी)-येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात 14 ते 28 जानेवारी 2024 दरम्यान साजरा करण्यात येणाऱ्या मराठी भाषा संवर्धन पंधरवडाचा उद्घाटन समारंभ अध्यापक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रकाश कांबळे यांच्या हस्ते संपन्न झाला. 

कार्यक्रमाच्या प्रारंभी कवी कुसुमाग्रज व शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. तदनंतर मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. शिवाजी गायकवाड यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे महत्त्व आणि आयोजना पाठीमागची भूमिका प्रास्ताविकातून विशद केली. तसेच मराठी विभागाच्या वतीने या भाषा संवर्धन पंधरवड्यात वक्तृत्व स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, अनुवाद लेखन स्पर्धा, शुद्धलेखन स्पर्धा, विद्यार्थी कवी संमेलन, भित्तिपत्रिका आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले. त्यानंतर प्रमुख अतिथींचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले. प्रमुख अतिथी डॉ. कांबळे यांनी आपल्या मनोगतातून मराठी भाषा संवर्धन ही काळाची गरज असल्याचे सांगितले. मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्याची भूमिका ही प्रत्येक मराठी भाषिकाची असली पाहिजे, मराठी भाषा ही संस्कार संपन्न आहे. माणसाला ज्ञानी व विचारसंपन्न करणारी आहे.असे महत्वपूर्ण विचार त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. श्रीराम नागरगोजे हे उपस्थित होते. त्यांनी अध्यक्षीय समारोपातून मराठी भाषा जतन व संवर्धन करणे ही काळाच्या ओघात नितांत आवश्यक आहे असे सांगून मराठी भाषेतील ज्ञानाचा ठेवा प्रवाही राहिला तरच पिढ्या संस्कारसंपन्न बनतील असा आशावाद त्यांनी आपल्या अध्यक्षीय  समारोपातून व्यक्त करून मराठी भाषा संवर्धन पंधरवडासाठी शुभेच्छा दिल्या. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी केले तर आभार प्रा. राजा जगताप यांनी मानले. कार्यक्रमाला मराठी विभागाच्या प्रा. डॉ. वैशाली बोबडे, प्रा. सुवर्णा गेंगजे, डॉ. मारुती लोंढे, डॉ. दत्तात्रय साखरे, प्रा. माधव उगीले  तसेच महाविद्यालयातील इतर  गुरुदेव कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.


 
Top