धाराशिव (प्रतिनिधी)-प्रसिध्द अभिनेते तथा होममिनिस्टर फेम महाराष्ट्राचे लाकडे भावोजी आदेश बांदेकर प्रस्तुत खेळ मांडियेला सन्मान महिलांचा, जिजाऊ, सावित्री, रमाईच्या लेकींचा हा मनोरंजनात्मक कार्यक्रम शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने शनिवारी आयोजित करण्यात आला होतो. जिल्हा परिषद मल्टीपर्पज शाळेच्या मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाला महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. यावेळी पहिल्या तीन विजेत्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते पैठणी देवून सन्मान करण्यात आला.
दैनंदिन व्यस्ततेतून मात-भगिनींना स्वतःसाठी वेळ मिळावा, मनोरंजनाबरोबर त्यांच्यातील सुप्त कलाकुणांना, कौशल्याला वाव मिळावा, यासाठी महाराष्ट्राचे भावोजी आदेश बांदेकर यांचा खेळ मांडियेला कार्यक्रमास धाराशिवच्या महिलांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली होती. या कार्यक्रमाला खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर सपत्नीक उपस्थित होते. याशिवाय पंचायत समितीचे माजी उपसभापती शाम जाधव, शहराध्यक्ष सोमनाथ गुरव, युवा सेनेचे विभागीय सचिव अक्षय ढोबळे, युवती जिल्हाप्रमुख मनिषा वाघमारे, पंकज पाटील, बाळासाहेब काकडे, रवी वाघमारे, दिनेश बंडगर, केदार साळुंखे आदीसह मान्यवर उपस्थित होते.
तब्बल चार तास महिलांना खिळवून ठेवत आदेश बांदेकर यांनी विविध खेळ, मस्ती, मजा करत उपस्थितांचे मनोरंजन केले. खेळात सहभागी महिलांनी स्पर्धेत सहभागी होवून बक्षिसे जिंकली आणि मानाच्या पैठणीही पटकावल्या. कधीही घराबाहेर न पडणाऱ्या या महिला कार्यक्रमामुळे घराबाहेर पडल्या. मनसोक्त स्पर्धा खेळल्या, नृत्य केले तसेच मनमोकळेपणाने हसल्या, या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांनी आनंद द्विगुणीत केला.
या कार्यक्रमात घेण्यात आलेल्या महिलांच्या स्पर्धेत अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. पहिला क्रमांक संजीवन कृष्णा तांबे यांनी पटकावला. तर दुसरा क्रमांक रत्नमाला अंबादास पवळे यांनी व तिसरा क्रमांक निर्मला दिलीप मोहिते यांनी पटकावला.