धाराशिव (प्रतिनिधी)-नापिकी, हमीभाव नाही, नैसर्गिक आपत्तीची भरपाई नाही, कर्जमाफीच्या लाभाची प्रतीक्षा, खाजगी सावकारासह बँकांच्या कर्जाचा वाढलेला बोजा, ऊस उत्पादक शेतकरी व कांद्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांची झालेली कोंडी, 2022 ते 2023 या दोन वर्षाच्या कालावधीत महायुती सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या असून हे सरकार सर्व स्तरावर अपयशी ठरले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी मुख्यमंत्री तत्काळ राजीनामा द्या, अशी मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी केली आहे.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बहुसंख्य शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा व त्यांच्या कुटुंबियांना स्वावलंबी बनवण्याचे प्रयत्न करत असतानाही शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत. 


एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार 

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार गेल्या दोन वर्षात देशात महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या शेतकरी- शेतमजुरांनी केल्या असल्याचे उघड झाले आहे. 

अतिवृष्टीमुळे तर मराठवाडा-विदर्भात मोठे नुकसान झाले आहे. शेतीपिके, जनावरे वाहून गेली, महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असून शेतकऱ्यांना जनावरासाठी चारा व पाणी नाही त्यातच शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात असतानाही सरकारने मदत केली नाही. ना पिकविमा कंपनीने शेतकऱ्यांना मदत केली नाही.

त्यामुळे शेतकरी आत्महत्या जास्त वाढले आहेत. दुष्काळ, अतिवृष्टी,गारपीट, अवकाळी पाऊस, पिकावरील रोग, उत्पादन खर्चा इतकेही उत्पन्न शेतमालाचे विक्रीतून न निघणे व व्यापाऱ्यांकडून फसवणूक होणे यासारख्या विविध कारणामुळे शेतकरी आत्महत्याच्या सातत्याने घटना घडत असल्यामुळे शेतकरी या दुष्टचक्रातून बाहेर पडत नाही. असे मत ॲड. भोसले यांनी व्यक्त केले.


 
Top