धाराशिव (प्रतिनिधी)-मराठा आरक्षणासाठी राज्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील विद्यमान सरकारने इम्पिरिकल डेटा संकलित करण्याचे काम सुरू केले आहे.परंतु हे सर्वेक्षण योग्य पद्धतीने होत नसल्याचे सांगत मराठा समाजाला ओबीसी आरक्षण दिले तरी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नका, असा इशारा माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिला.
धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात बुधवारी (दि.24) पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी ओबीसी समाजाचे नेते जी. बी. तांडेल, वंजारी समाजाचे नेते टी. पी. मुंडे, चंद्रकांत बावकर, धनगर समाजाचे नेते अर्जुन सलगर, ओबीसी समाजाचे जिल्हा प्रमुख तथा मेळाव्याचे आयोजक सचिन शेंडगे, डॉ. सुदर्शन सिद्धे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पत्रकार परिषदेत बोलताना शेंडगे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्रातील सरकार अनुकूल नाही. परंतु मराठा आरक्षणासाठी मनोज जारांगे पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचे सांगत आहेत. आरक्षणाची मर्यादा ओलांडून ते कुठल्या मार्गाने आरक्षण देणार आहेत ते मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे. कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले. यावेळी ओबीसी समाजाचे बहुसंख्य नेते, पत्रकार उपस्थित होते.