परंडा (प्रतिनिधी)- राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सुरुवातीच्या काळामध्ये संगोपन करत असताना त्यांच्या शिक्षणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्यांच्यामध्ये अभिमानाची भावना शौर्य आणि  मूल्यांची सखोल जाण निर्माण केली असे प्रतिपादन जिजाऊ ब्रिगेडच्या धाराशिव जिल्हाध्यक्ष आशा मोरजकर यांनी केले. 

श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालयात आयोजित केलेल्या जिजाऊ जन्मोत्सव 2024 या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य डॉ.महेशकुमार माने तर व्यासपीठावर सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे ,कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख ,युवती मंचच्या समन्वयक शेख एम.,प्रा. प्रतिभा माने उपस्थित होत्या. यावेळी कनिष्ठ वरिष्ठ विभागातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पुढे बोलताना आशा मोरजकर म्हणाल्या की, मुलींनी राजमाता जिजाऊ माता रमाई सावित्रीबाई फुले फातिमा शेख यांचे विचार आत्मसात करून ते विचार जन माणसापर्यंत पोहोचवले पाहिजे त्यांच्या योगदानाबद्दल विविध कार्यक्रम आयोजित करून त्यांच्या कार्याचा गौरव केला पाहिजे.आज त्यांच्यामुळे या देशातील महिला मोठ्या पदावर कार्यरत आहेत.त्या महिला केवळ एका जातीच्या एका धर्माच्या नसून समस्त बहुजन समाजासाठी त्यांनी अनमोल  कार्य करून त्या महान बनल्या. यावेळी महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक तृप्ती जाधव या विद्यार्थिनीने केले. तर आभार कडबने या विद्यार्थिनीने केले. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. 
Top