धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गासाठी राबविण्यात आलेल्या भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा खूप कमी मावेजा मंजूर करण्यात आला आहे. वाटाघाटीने ही भूसंपादन प्रक्रिया पार पडली असती तर लवादाकडे दाद मागण्याची सोय राहिली नसती. प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी थेट भूसंपादन करण्यात आले आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना लवादाकडे दाद मागण्याचा मार्ग शिल्लक राहिला आहे. पुढील दोन दिवसात लवादाची नियुक्ती केली जाणार आहे. विभागीय आयुक्तांकडे त्यासाठी प्रक्रिया सुरू असून आपण सातत्याने त्याचा पाठपुरावा करीत असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

धाराशिव -तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गासाठी ज्या शेतकऱ्यांचे भूसंपादन करण्यात आले आहे त्यांना योग्य भाव  मिळवून देण्यासाठी तातडीने लवाद नेमावा यासाठी आपला रेल्वे विभागाकडे सतत पाठपुरावा सुरू होता. सोमवार 22 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर विभागाच्या महसूल आयुक्तांना लवाद म्हणून काम करण्यासाठी वरिष्ठ महसुली अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी रेल्वे विभागाकडून पत्र देण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी ततातडीने लवाद म्हणून जिल्हाधिकारी यांचीच नेमणूक करण्याबाबत मराठवाडा विभागाचे आयुक्त मधुकर आर्दड यांच्याशी आपण स्वतः फोनवरून चर्चा केली आहे. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने लवाद नेमण्याबाबत आश्वस्त केले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

सध्या राबविण्यात आलेल्या भूसंपादन प्रक्रियेत अधिकाऱ्यांनी ज्या चुका केल्या आहेत त्याबाबत प्रत्येक गावातील प्रमुख तक्रारी लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात याव्यात. जिल्हाधिकाऱ्यांनी प्राप्त झालेल्या तक्रारींचा अभ्यास करून सविस्तर अहवाल तयार करावा अश्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.अहवाल प्राप्त झाल्यावर जिल्हाधिकारी,या प्रक्रियेशी संबंधित अधिकारी,शेतकरी व वकिलांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. या अहवालातील महत्वपूर्ण निष्कर्षानुसार लवादासमोर कायदेशीर बाबी मांडल्यामुळे फायदा होणार आहे. या प्रकल्पातील सर्व शेतकऱ्यांना रास्त मोबदला मिळावा यासाठी आपण कटिबद्ध असून जोवर न्याय मिळत नाही तोवर आपण लढा देत राहणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.


 
Top