धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव लोकसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत गाजर दाखवून भावनिक आवाहन करून निवडून आलेल्या खासदाराने मतदारसंघातील 18 लाख लोकांसाठी गेल्या पाच वर्षात एकही विकासाची योजना आणली का? असा प्रश्न पालकमंत्री सावंत यांनी उपस्थित केला. आगामी लोकसभा निवडणुकीत आमच्या 14 पक्षाच्या महायुतीचा उमेदवार अडीच ते साडेतीन लाख मतांनी निवडून आणू असे आव्हान पालकमंत्री सावंत यांनी विद्यमान खासदार यांना दिले आहे. 

 महायुतीतील 14 घटक पक्षातील कार्यकर्त्यांचा महामेळावा रविवार दि. 14 जानेवारी रोजी धाराशिव शहरात घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री सावंत बोलत होते. महायुतीतील भाजपचा आमदार राणाजगजितसिंह पाटील, शिंदे शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले, माजी खासदार रविंद्र गायकवाड, बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुरेश बिराजदार, रिपाइं आठवले गटाचे राजाभाऊ ओव्हाळ, प्रहार संघटनेचे मयुर काकडे आदी उपस्थित होते. 

पालकमंत्री सावंत यांनी महायुतीची सुरूवात धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीपासून सुरू झाली. देवेंद्र फडणवीस यांनी त्याचवेळी युती करण्यास सांगितल्यामुळे आम्ही जिल्हा परिषदमध्ये शिवसेना-भाजपची सत्ता आणली होती. देशात व राज्यात एनडीए व महायुतीचे सरकार आल्यापासून देशात व राज्यात प्रत्यक्ष कृती करून विकास केला आहे. जो विकास लोकांच्या घरापर्यंत, शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाईल तोच आपला नेता असतो. त्यामुळे नेत्यांच्या मागे जनतेला पळण्याची गरज नाही. 2014 पासून घरातील आई,वडील, आजी, आजोबा, सांगून सुध्दा विरोधकांना मतदान न करता महायुतीला मतदान करतात असे सांगून पालकमंत्री सावंत यांनी विरोधकांची स्थिती शोले पिच्चर मधील सारखी झाली आहे. आधे उधर, आधे इदर पण शेवटी मागे कोणीच नाही असे सावंत म्हणाले. 

यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जनतेचे बारकाईने महायुतीकडे लक्ष आहे. त्यामुळे आपल्या कृतीमधून महायुती दाखवून द्या. आजपर्यंतचे जे काही हेवेदावे असतील ते इतिहास जमा करा. लोकसभेचा उमेदवार अभ्यासपूर्ण सर्व्हे करून ठरेल. त्यामुळे जागतिक लोकप्रिय लाभलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परत एकदा पंतप्रधान होती असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार राजाभाऊ राऊत, राजाभाऊ ओव्हाळ, सुरेश बिराजदार, दत्ता साळुंके यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपचे संताजी चालुक्य यांनी केले. महायुतीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सर्वांना मानसमान द्यावा अशी मागणी चालुक्य यांनी पालकमंत्र्यांकडे केली. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, ॲड. मिलिंद पाटील, माजी जि. प. अध्यक्ष नेताजी पाटील, धनंजय सावंत, नंदा पुनगुडे, महेंद्र धुरगुडे, आण्णासाहेब देशमुख, भारत डोलारे, सुरज साळुंके, सुनिल काकडे, विनोद गपाट आदीसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


विकास पर्व चालू

महायुतीचे सरकार आल्यापासून धाराशिव लोकसभा मतदारसंघात विकास पर्व सुरू झाले आहे. कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना, सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे आधी गतीने कामे चालू आहेत. कृष्णा स्थिरीकरणाचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. विकासाची गंगा सामान्य लोकांपर्यंत पोहचल्यानंतर शेतकऱ्यांना सुखा समाधानाचे दिवस येणार आहेत असे पालकमंत्री सावंत म्हणाले.


जाता जाता इशारा

पालकमंत्री तानाजी सावंत यांनी आपले विकासात्मक जोरदार भाषण करत करत शेवटी आपण विकासाबाबत स्फोटक आहोत. लोक मलाच स्फोटक म्हणतात. त्यामुळे कोकण किंवा विदर्भातील लोकांनी आम्हाला शिकवू नये असा इशारा देत नाही तर कोठे स्फोट करून फटाके वाजविण हे समजणार देखील नाही असा इशारा भाषणाच्या शेवटी पालकमंत्री सावंत यांनी दिला. नेमका हा इशारा सावंत यांनी कोणाला दिला? याबद्दल चर्चा सुरू झाली. 



 
Top