धाराशिव (प्रतिनिधी)- मराठा व धनगर आरक्षणासाठी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लोकसभेच्या अधिवेशनात आवाज उठविला. शुन्य प्रहर कालामध्ये या दोन्ही समाजाच्या आरक्षणासाठी घटनात्मक कायद्यात दुरूस्ती करावी, अशी मागणी खासदार राजेनिंबाळकर यांनी केली. तसेच मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणासाठी वारंवार मागणी करून केंद्र सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करती असल्याचा आरोपही त्यांनी केला.
लोकसभेच्या अधिवेशनामध्ये शुन्य प्रहर कालामध्ये महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाच्या विषयावर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मराठा व धनगर समाजास आरक्षण देणेसाठी दुरुस्ती कायदा चर्चेस घेणेबाबत विनंती केली. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मराठा समाजास आरक्षण देणेबाबत लोकसभेच्या दि. 20/09/2020 रोजीच्या अधिवेशनात शुन्य प्रहर कालामध्ये प्रश्न उपस्थीत केला होता. त्यानंतर दि. 18/03/2021 व 14/12/2022 रोजीच्या अधिवेशनामध्ये आरक्षणासंदर्भामध्ये प्रश्न उपस्थीत केला होता. यावरती केंद्र सरकारने कोणतीही कार्यवाही न केल्याने दि. 18/11/2023 रोजी भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मुजी यांची शिवसेना (उबाठा) खासदाराच्या शिष्ट मंडळासह भेट घेवून सदर आरक्षणावर कायमस्वरुपी मार्ग काढण्याची विनंती करण्यात आली होती.
मात्र या सर्व गोष्टीकडे केंद्र सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे त्यामुळे आज चालू अधिवेशनात शून्य प्रहारमध्ये मराठा समाजाचे आरक्षण कायम राहावे यासाठी घटनात्मक दुरुस्ती करावी व राज्य सरकारला 50% पेक्षा पुढे आरक्षण देण्याचे अधिकार पूर्वीप्रमाणे कायम ठेवावे व धनगर समाजाला अनुसूचित प्रवर्गामध्ये समाविष्ठ करावे अशी मागणी केली.