धाराशिव (प्रतिनिधी)- भारतरत्न माजी पंतप्रधान कै. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त लोकसेवा समिती, धाराशिव या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा लोकसेवा पुरस्कार - 2023 वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी अशा पुरस्कारासाठी निस्वार्थपणे समाजाहिताचे काम करणारे लोक समोर येणे महत्वाचे आहे असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाची सुरुवात अटलजींच्या प्रतिमा पुजनाने व दिप प्रज्वलनाने झाली. पुरस्काराचे हे 14 वे वर्ष असून हा पुरस्कार मराठवाडा स्तरीय पुरस्कार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुरस्कार संयोजन समितीचे अध्यक्ष ॲड. मिलिंद पाटील होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून धाराशिवचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, शेषाद्री डांगे, कमलाकर पाटील, शिवाजीराव कदम यांची उपस्थिती होती. 

यावर्षीचा लोकसेवा पुरस्कार- 2023 परंडा (जि. धाराशिव) येथील जगन्नाथ राजाराम साळुंके, मुरुड (जि. लातूर) येथील विद्यासागर चंद्रसेन कोळी आणि बुधोडा (ता. औसा) शरद केशवराव झरे यांना प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष मिलिंद पाटील म्हणाले की, निरपेक्ष वृत्तीने लोक कल्याणाचे कार्य करणाऱ्या आदर्श व्यक्तींपासून प्रेरणा घेऊन तरुणांनी कार्य करणे गरजेचे आहे. तर शेषाद्री डांगे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी लोकसेवा समितीला सहकार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. योगेश कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुन आभार मानले. कार्यक्रमास जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top