धाराशिव (प्रतिनिधी)- शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणानंतर विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले जातात. वेगवेगळ्या ठिकाणीच नाही तर काही विद्यार्थी जागतिक स्तरावर उंच भरारी घेतात .पण त्यांचे पाय मात्र जमिनीवरच असतात. आणि आयुष्यामध्ये यशस्वी टप्पा गाठला तरी महाविद्यालयीन काळातील मोरपंखी आठवणी , यशासाठी केलेली कसरत हे सारच कसं हृदयाच्या कुपीत बंदिस्त केलेल असतं. कित्येक वर्षानंतर ही नुसत्या आठवणी सुद्धा मनाला उभारी देतात . त्यासाठीच आता प्रत्येक महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थ्यांचे मेळावे भरवले जातात.
याच धर्तीवर येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाने गतवर्षी अभिनव उपक्रम करत जागतिक स्तरावरील ॲल्युमिनिमिट (माजी विद्यार्थी मिळावा ) घेण्याचा पहिलाच प्रयत्न केला आणि त्याला उदंड असा प्रतिसाद मिळाला. अभियांत्रिकी सारख्या उच्च शिक्षणानंतर काही विद्यार्थ्यांना यश मिळून ते देशातच नव्हे तर परदेशामध्ये अनेक नामांकित कंपन्यांमध्ये युनायटेड स्टेट्, कॅनडा, सौदी,ऑस्ट्रेलिया या यासारख्या विविध देशात व तसेच भारतातील प्रमुख शहरांमध्ये मुंबई हैदराबाद,चेन्नई,दिल्ली, कलकत्ता, पुणे व बेंगलोर या नामांकित शहरांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. तर काही विद्यार्थी पुणे , दिल्ली, कलकत्ता, मुंबई येथे उद्योगपती बनून त्यांनी अनेकांना नोकरी देऊ केलेली आहे. तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 90 च्या दशकातील आणि त्या पुढील विद्यार्थ्यांनी एकत्र येत ॲल्युमिनिमिट घेण्याचं ठरवलं .अथक परिश्रम घेऊन नुकतीच त्यांनी पनवेल येथील आयुष्य रिसॉर्ट मध्ये दोन दिवसीय माजी विद्यार्थ्यांचा मेळावा भरवला. यामध्ये आपल्या सर्व शिक्षकांना निमंत्रित केले. या मेळाव्यासाठी देशविदेशातून 100 पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले.यामध्ये मारुती सुझुकी, विप्रो , टीसीएस ,कॅप जेमीनी, रिलायन्स जिओ,मर्सिडीज बेंज, महिंद्रा अँड महिंद्रा, आयबीएम अशा नामांकित कंपन्या बरोबरच स्वतःचे उद्योग असलेले उद्योगपती , शासकीय उच्चपदस्थ अधिकार,शास्त्रज्ञ, संरक्षण खात्यातील उच्चपदस्थ या सर्वांनीच सहभागी होत आपल्या गुरु प्रति आदर, सन्मान केला. एकमेकांशी हितगुज केलं. प्रत्येक विद्यार्थी जेव्हा स्वतःचा परिचय देत होता तेव्हा अत्यंत भावुक होऊन संपूर्ण सभागृह त्यांची कथा ऐकत होते. उस्मानाबाद येथून अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने, डॉ.डी डी दाते, प्रा.ए.बी. घळके, प्रा.ए.झेड.पटेल, प्रा.एस एम पवार, प्रा. डी. एच निंबाळकर, प्रा.आर व्ही गुरव, ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्रा.अशोक जगताप हे आजी व डॉ.एम व्ही कुलकर्णी, प्रा. आर. ए. पंके ,प्रा.एम.डी.पाटील, प्रा.ए एन यादव,डॉ. एस एस कानडे,प्रा चौगुले ए ए ,प्रा.एस आर बागल, प्रा.एस व्ही सुरवसे, श्री राजकुमार खोत, श्री विजय धारूरकर हे माजी प्राध्यापक या अल्युमिनिमिटमध्ये सहभागी झाले होते.
माननीय आमदार राणाजगजितसिंह पाटील व विश्वस्त मल्हार पाटील यांच्या सल्ल्याने व प्रा. बाळकृष्ण लामतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यासाठी याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तंत्रनिकेतन खोपोली येथील प्राचार्य प्रशांत माने, बांधकाम व्यावसायिक उद्योजक व दिग्दर्शक ऋषिकेश मोरे,नेव्ही मध्ये ऑफिसर असलेले अमित भटनागर, सुप्रसिद्ध व्यावसायिक रविकांत, कपिल जैन, प्रवीण होळे, अर्चना हजारे, सुधीर नायर,जसवंतसिंग राणा, अर्चना हंजगे, संदीप शिंदे व इतर माजी विद्यार्थ्यांनी या मेळाव्यासाठी विशेष परिश्रम घेऊन हा मेळावा यशस्वी यशस्वीपणे उत्साहात पार पडला.
यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने म्हणाले की,गेल्या वर्षी पहिल्यांदाच जागतिक स्तरावरील ॲल्युमिनि मीट करण्यात आम्ही यशस्वी झालो. त्यामुळे विद्यार्थ्यासोबतच आमचाही उत्साह वाढलेला होता .या मेळाव्याचा फायदा निश्चितच कॉलेज च्या विद्यार्थ्यांना रेडी इंजिनियर बनवण्यासाठी होणार आहे .कॉलेजमध्ये कसा कसा बदल घडत गेला हे विद्यार्थ्या समोर सांगताना प्राचार्य डॉ. माने म्हणाले की ,पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये घेतली भरारी ,नवनवीन शाखेची सुरुवात, यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स ,सिस्कोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिलेले ट्रेनिंग, त्याचा झालेला विद्यार्थ्यांना फायदा , रेडिओ 90 स्टेशन त्याचबरोबर या भागातील पहिलेच ड्रोन ट्रेनिंग सेंटर आणि त्या अंतर्गत देण्यात येणाऱ्या विविध ट्रेनिंग, एप्पल लॅब अशा विविध विषयावर त्यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले . तसेच ते बोलताना पुढे म्हणाले की, आज या महाविद्यालयातून दहा हजाराहून जास्त विद्यार्थी बाहेर पडले असून त्यांची महाविद्यालयाला प्रशिक्षण व नोकरीसाठी मोलाची मदत होत आहे.या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याच्या माध्यमातून रिसर्च अँड डेव्हलपमेंट या कामात नक्कीच या विद्यार्थ्यांची मदत होऊन महाविद्यालय संशोधन क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर जाण्यास मदत होईल.हा मला विश्वास आहे. माजी विद्यार्थ्यांनीही प्राचार्यांच्या मनोगतनंतर आपण महाविद्यालयासाठी भरघोस मदत करणार असून या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्विस साठी तसेच त्यांच्या इंडस्ट्रियल व्हिजिट साठी आपण प्रयत्नशील राहू अशी त्यांनी ग्वाही दिली.
या अल्युमिनिमिटसाठी उपस्थित असणाऱ्या सर्व प्राध्यापक व माझी विद्यार्थ्यांचा यावेळी ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. या यशस्वी मेळाव्याबद्दल तेरणा ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ. पद्मसिंह पाटील आणि आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी सहभागी स्टाफ व सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
