धाराशिव (प्रतिनिधी) - व्हाईस ऑफ मीडिया संघटना पत्रकारांच्या प्रश्नावर काम करीत आहे. मात्र सामाजिक क्षेत्रात विविध प्रश्न हाताळीत असतानाच अनाथ मुला-मुलींचे प्रश्न हाताळून त्यांना मातृत्वाचा आधार देण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी स्वनाथ फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासह ममत्वाचा आधार देण्यासाठी खास पुढाकार घेणार असल्याचे प्रतिपादन व्हाईस ऑफ मीडिया महिला विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षा सारिका महोत्रा यांनी दि.27 डिसेंबर रोजी केले.

धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहात व्हाईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती व बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी स्वनाथ फौंडेशनच्या संचालिका श्रेया भारतीय, व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना महोत्रा म्हणाल्या की, अनेक दाम्पत्यांना मुल नसल्यामुळे ते अपत्य दत्तक घेण्यासाठी प्रयत्न करतात. दत्तक घेणाऱ्यांची संख्या राज्यात 3 लाख तर देशांमध्ये 3 कोटींच्या जवळपास असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे अनाथ मुलांचा अंतर्गत सांभाळ करण्यासाठी केंद्र सरकारने प्रती पालकत्व ही अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. तर श्रेया भारतीय म्हणाल्या की, लहान मुले व मुलींना त्यांचे बालपणातील आई-वडील व पर्यायाने पालकांचे प्रेम मिळण्यासह संस्कार मिळणे अत्यावश्यक असते. मात्र अनाथ बालकांना आई वडील नसल्यामुळे ते प्रेम मिळत नाही. तसेच संस्कार देखील मिळत नाहीत. त्यामुळे त्यांना ते प्रेम व संस्कार मिळावेत यासाठी प्रतिपालक योजने अंतर्गत सांभाळ करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे या योजने अंतर्गत अनाथांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोलाची मदत होणार असून समाजातील प्रत्येक घटकांनी यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. तसेच या योजने अंतर्गत सांभाळ करण्यासाठी अनाथ बालकांना घेतल्यास मूल नसलेल्या दांपत्यास मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे प्रती पालक होऊन अनाथ बालकांना सांभाळ करण्याचा आनंद होण्याबरोबरच सामाजिक दायित्व देखील मोठ्या प्रमाणात निभावायला फार मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे समाजातील जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेमध्ये सहभागी होऊन अनाथ मुलांना आधार बनण्यासाठी पुढे यावे असे आवाहन श्रेया भारतीय यांनी केले. यावेळी राज्य समन्वयक प्रसिद्धी प्रमुख तथा प्रवक्ते रहीम शेख, मराठवाडा उपाध्यक्ष अमर चोंदे, महानगराध्यक्ष मल्लिकार्जुन सोनवणे, साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मते, डिजिटल विंगचे जिल्हाध्यक्ष वैभव पारवे, धाराशिव तालुकाध्यक्ष अमजद सय्यद, आकाश नरोटे, अमोल रणदिवे, रामरतन कांबळे, इरफान शेख, असिफ मुलानी, शाहरुख सय्यद, किशोर कांबळे, कुंदन शिंदे, किरण कांबळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top